महापौर निवडीच्या बैठकीमध्ये चमत्कार होऊन भाजप-ताराराणी आघाडीचा महापौर झाल्याचे निश्चितपणे पाहायला मिळेल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत व्यक्त केले. विजयाच्या जल्लोषाची तयारी करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता येईल असा विश्वास पालकमंत्री व्यक्त करीत होते. मतमोजणी अंती भाजप-ताराराणी आघाडीला ३३ जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर पाटील यांनी मतदारांचा कौल पाहून विरोधी बाकावर बसू, असे विधान केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी छुप्या हालचाली सुरू केल्या. सत्ता प्राप्त करण्यासाठी ४१ सदस्यांची गरज असल्याने त्यांनी तशी जुळवाजुळवही सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न जारी ठेवले आहेत. या घडामोडींवर पाटील यांनीच एका बठकीत खुलासा केला.
भाजप-ताराराणी आघाडीच्या विजयी व पराभूत उमेदवारांची बठक हॉटेल अयोध्या येथे सायंकाळी झाली. या वेळी पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय आमदार हसन मुश्रीफ नव्हे तर शरद पवार घेतात. याकरिता आपण उद्या मुंबईला जात असून परवा नवी दिल्लीला जात आहे. महापौर निवडीच्या बठकीत भाजपाचच महापौर होणार असून विजयी मिरवणुकीसाठी सज्ज राहा.
या विधानावर प्रतिक्रिया नोंदविताना सतेज पाटील यांनी महापौर निवडीचा चमत्कार म्हणजे कोल्हापुरात घोडेबाजार सुरू करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.