कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व विकास झाला आहे. आघाडीला १५ वर्षांत करता आले नाही ते काम अल्पकाळात दादांनी करून दाखवले आहे. या कामाच्या आधारेच जनादेश मागण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्री जनतेकडे येत असून असे राज्यात प्रथमच घडत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुधाळ तिठा येथे केले.

भाजपच्या वतीने आयोजित केलेल्ली महाजनादेश यात्रा राधानगरीकडे जात असताना मुधाळ तिठा तसेच बिद्री (ता. कागल) येथे जनसमुदायासमोर फडणवीस बोलत होते. सरकारच्या कामावर जनतेचा विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतरूपी आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.

समरजित घाटगे उमेदवार

या वेळी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे ‘म्हाडा’चे (पुणे) अध्यक्ष समरजित घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून कागलची जागा भाजपला मिळणार असल्याचे संकेत दिले. आमदारांना गेल्या १५ वर्षांत सत्ता असतानाही जे जमले नाही ते समरजित घाटगे यांनी आमदार नसतानाही करून दाखवले आहे. ‘समरजितना एकदा संधी द्या, कागलचा उर्वरित विकास करण्याचा आपण शब्द देतो,’ अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, समरजित घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे ही जनादेश यात्रा मुधाळ तिट्टा मार्गे राधानगरीकडे रवाना झाली.

मुख्यमंत्री प्रथमच या परिसरात येणार असल्याने लोकांमध्ये यात्रेविषयी उत्सुकता होती. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी मोठी गर्दी केली होती.