कोल्हापूरकरांना नेमके काय हवे आहे, हेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विसरले. त्यामुळेच पाटील यांच्या उमेदवारांचा कोल्हापुरात पराभव झाला, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे गुरुवारी लगावला.

मंत्री पाटील यांनी, आमचे काय चुकले ते सांगा, असा सवाल कोल्हापूरकरांना केला होता. कोल्हापुरात विकासकामे होऊनही आमचा पराभव कसा झाला, अशी विचारणा करीत त्यांनी याचे उत्तर जनतेने द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर समाज माध्यमातून अनेकांनी त्यांच्यावर काय, कसे चुकले याचा पाढा वाचला. आता त्यात मुश्रीफ यांच्या रूपाने विरोधकांची भर पडली आहे. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरकरांच्या कुठल्याही कामाला मंत्री पाटील कधी धावले नाहीत. कोल्हापूरकरांना नेमके काय हवे आहे हेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विसरले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चुकांची यादी वाचताना मुश्रीफ यांनी अनेक त्रुटीवर बोट ठेवले. ते म्हणाले, पाटील हे नेहमी पोलिसांच्या गराडय़ात असतात. त्यांच्याकडे सामान्य माणूस काम घेऊ न गेला की त्याच्याशी उद्धटपणे वागतात. पालकमंत्री म्हणून पाच वर्षांत कोल्हापूरकरांच्या लक्षात राहील, असे एकही काम त्यांनी केले नाही. निवडून येण्यासाठी प्रथम नेत्यांनी लोकांच्या मनात घर करावे लागते, असा सल्ला त्यांनी दिला. जिल्हा बँक, राज्य बँक तसेच प्राप्तिकर विभागाचा छापा आदींमार्फत माझी अडवणूक करण्याचे कामच पाटील यांनी केले. अशी अडवणूक करून काही साध्य  होत नसते. पाटील यांना कोल्हापूरकर कळलेच नाहीत, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

सहा संचालक आमदार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहा संचालक आमदार झाले. पी. एन. पाटील, विनय कोरे, राजू आवळे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि हसन मुश्रीफ असे सहा जिल्हा बँकेचे संचालक आमदार झाल्याने त्यांचा जिल्हा बँकेत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुश्रीफ बोलत होते.

युतीच्या पराभवाची जबाबदारी संयुक्त – मंडलिक

जिल्ह्यत महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाचे माझ्या एकटय़ावर खापर फोडण्याऐवजी चंद्रकांत पाटील व मी अशी त्याची संयुक्तपणे जबाबदारी घेणे गरजेचे होते. मात्र असे न करता मंत्री पाटील यांनी सर्व खापर माझ्यावर फोडले, असा प्रतिवाद मंडलिक यांनी या वेळी केला.