20 January 2018

News Flash

सरसेनापती धनाजी जाधव यांचे स्मारक विकसित करणार- पाटील

धनाजी जाधव यांचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ‘अद्वितीय  स्मारक’ म्हणून विकसित करण्यात येईल, 

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: July 31, 2017 12:16 AM

वडगाव येथील उद्यान या कामाचा शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

वडगाव येथील सरसेनापती धनाजी जाधव यांचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ‘अद्वितीय  स्मारक’ म्हणून विकसित करण्यात येईल,  अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. याबरोबरच वडगाव शहरासाठीची पाणी योजना, भुयारी गटार योजना असे प्राधान्य क्रमाचे विषयही मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेंतर्गत सव्वा दोन कोटी रुपये खर्चाच्या वडगाव (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या संभाजी उद्यान या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.

वडगाव शहराच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे स्पष्ट करुन मंत्री पाटील म्हणाले, वडगाव शहरासाठीची ३४ कोटीची पाणी पुरवठा योजना लवकर मार्गी लावली जाईल. तसेच भुयारी गटार योजना राबविण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ प्रस्ताव सादर करावा, त्याचा पाठपुरावा केला जाईल. शहराचा विकास करताना शासकीय योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्याबरोबरच शहर विकासमध्ये लोकसहभागही वाढवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

खासदार राजू शेट्टी यांनी विकासाची कामे शासन योजनांबरोबरच लोकसहभागातूनही भर देण्याचे आवाहन केले. आमदार डॉ. सुजित मिणचेकर याप्रसंगी बोलताना म्हणाले, ऐतिहासिक वडगावनगरीत संभाजी उद्यानातील ओपन जिमसाठी आमदार फंडातून १० लाखांचा निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

नगराध्यक्ष मोहन माळी यांनी प्रास्ताविक केले. उपनगराध्यक्षा प्रविता सालपे, नगरसेवक संतोष गाथाडे, गुरुप्रसाद यादव यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी आभार मानले.

First Published on July 31, 2017 12:16 am

Web Title: chandrakant patil promise to develop memorial of sarsenapati dhanaji jadhav
टॅग Chandrakant Patil
  1. No Comments.