दयानंद लिपारे, कोल्हापूर

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड झाली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ निश्चित करताना पाटील यांची भूमिका निर्णायक असल्याने चंद्रकांतदादा आपल्याला सोयीचा मतदारसंघ मिळवून देतील, असे त्यांना वाटत आहे.

जिल्ह्य़ातील १० पैकी सहा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघ सेनेच्या वाटणीला आहेत. अवघ्या दोन जागा भाजपकडे येणार आहेत. लोकसभेप्रमाणेच पुन्हा जिल्ह्य़ात शिवसेनेचा प्रचार करून त्यांचे आमदार निवडून आणण्यासाठी भाजपाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपचे संख्याबळ, ताकद वाढली असल्याने आणि लोकसभा निवडणुकीत  असल्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नाराज आमदारांचे मतदारसंघ आपल्याला मिळवून देतील याचा विश्वास भाजपच्या इच्छुकांना असून त्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवातही केली आहे.  राज्याच्या राजकारणात कोल्हापूराचा चेहरा आणि ठेवणंही वेगळी आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादीचा ठसा असलेल्या या जिल्ह्य़ात गेल्या पाच वर्षांत नूर पालटला आहे. केंद्र आणि राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप- शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे लोकसभा, मागील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला दोन्ही जागा मिळवता आल्याने त्यांच्यातील उत्साह वाढला आहे.  दुसरीकडे देशभर विस्तारणाऱ्या भाजपाला कोल्हापुरातील आपला परीघ विस्तारण्याला मर्यादा आल्या आहेत. दोनच मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने पक्षातील इच्छुकांची कोंडी झाली आहे. अशा वेळी एक आशेचा मोठा किरण चंद्रकांदादांच्या रूपाने त्यांना दिसू लागला आहे.राज्य मंत्रिमंडळातील द्वितीय स्थान आणि आता त्याच्या जोडीला प्रदेशाध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आल्याने जिल्ह्य़ातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांतील भाजपच्या संभाव्य आकांक्षांना धुमारे फुटले आहे. चंद्रकांतदादांमुळे जिल्ह्य़ात जागावाटपात चांगल्या जागा वाटय़ाला येतील, असा भाजपमधील इच्छुकांना आतापासूनच वाटू लागले आहे.

दादा ‘किमान माझा मतदारसंघ तरी भाजपकडे घेतील’ अशा आशावाद अर्धा डझन मतदारसंघातील इच्छुकांच्या बोलण्यात दिसत आहे.  कागल-गडहिंग्लज मतदारसंघात महावितरणच्या एका कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षातील प्रबळ नेते माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनाच निमंत्रण दिले. ‘राज्यात १० आमदार भाजपत येणार आहेत, तुम्ही आलात तर अकरावे व्हा’ अशा शब्दांत दादांनी मुश्रीफ यांना मागणी घातली. विशेष म्हणजे कागलमधून म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेचा उमेदवार म्हणून दादांनीच त्यांचे नाव पुढे केले आहे. याच घाटगे यांच्या समोरच दादांनी मुश्रीफ यांना पक्ष प्रवेशाचे आवतण दिल्याने घाटगेही गोंधळले.दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे कोणत्या मतदारसंघातून लढणार याचेही कुतूहल आहे. कोल्हापूर उत्तर, राधानगरी, चंदगड या मतदारसंघांत त्यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री शरद पवार यांनी त्यांना ‘एकदा लोकांतून निवडून या’ असा चिमटा अनेकदा काढला आहे. त्यामुळे विधानसभा लढवायची का, लढवायची तर समोर येणारे मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीचे असल्याने त्याचे काय करायचे, या प्रश्नाचा गुंता त्यांना सोडवावा लागेल.  यावर चंद्रकांतदादांनी ठाम विधान केलेले नसल्याने संभ्रम  आहे. याच वेळी संभाव्य फेरबदल घडले तर शिवसेनेची प्रतिक्रिया कशी राहणार हे लक्षवेधी असणार आहे.