“दुसऱ्याला बोल लावण्याआधी आधी आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं,” अशा शब्दांत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुरुवारी पलटवार केला. काल पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यावर पाटलांनी टीका केली होती. त्यानंतर आज सायंकाळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

सतेज पाटील म्हणाले, “गेली पाच वर्षे मंत्रिपदी राहिलेले चंद्रकांत पाटील यांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायची सवय लागली आहे. कदाचित ते करोना काळातही एखादा इव्हेंट करून दाखवतील. त्यांना मंत्रिपदाच्या काळात कोल्हापूरच्या विकासासाठी काही करता आले नाही. आता मी पालकमंत्री असलो तरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर असे तिघेही एकत्रित काम करीत असल्याने करोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला आहे. कोल्हापूरविषयी प्रेम वाटत होते तर २२ मार्चपासून ते कुठं होते?” असा सावलही त्यांनी यावेळी केला.

“कोल्हापुरात माणसं जगली की मेली ते पाहायला तरी या” अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी केलेली टीका झोंबल्यानेच दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात येऊन चंद्रकांत पाटील यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री ठाकरे आणि जिल्ह्यातल्या मंत्रांवर बिनबुडाची टीका केली. पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार यांची बैठक घेऊन करोनाचे नियोजन याआधीच निश्चित केले आहे. जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार नसल्यामुळे ही माहिती चंद्रकांत पाटील यांना कळाली नसेल. कदाचित ते उद्या पुन्हा कोल्हापूर सोडून जातील आणि पावसाळा सुरु झाल्यावर परत येतील, असा चिमटाही यावेळी सतेज पाटील यांनी काढला.

वास्तविक पंतप्रधान मोदी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका असा संदेश दिला आहे. पण चंद्रकांत पाटील हे मात्र मंत्र्यांनी फिरून लोकांच्या संपर्कात राहावे असा चुकीचा सल्ला देत आहेत. सत्ता गेल्याची त्यांना बोचणी लागल्याने ते अशी काही विधाने करीत आहेत, अशी जोरदार टीका सतेज पाटील यांनी यावेळी केली.