भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं शुक्रवारच्या पुण्याच्या सभेत जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच महाविकास आघाडीतील दोन नेत्यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली. ‘पुणे सोडून मी कोल्हापूरला परत जाणार’ या विधानावर कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन मंत्र्यांनी शनिवारी त्यांना शाब्दिक चिमटे काढले.

एकनाथ खडसेंचा ‘तो’ प्रश्न अन् पत्रकारांमध्ये पिकला एकच हशा…

कोल्हापूरातून निवडणूक लढवण्याऐवजी पुण्यातील कोथरूड मतदारसंघ निवडल्यानंतर पाटील यांच्यावर टीका झाली होती. आता नव्या विधानाने त्यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. मंत्री सतेज पाटील यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.’मी पुन्हा कोल्हापूरला चाललोय. देवेंद्रजी, माझ्या विरोधकांना ही गोष्ट सांगून ठेवा’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून निशाणा साधत, ‘चंद्रकांत पाटील यांचे विरोधक त्यांच्याच पक्षातील आहेत. कदाचित त्यांचा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असावा,’ असा शाब्दिक चिमटा सतेज पाटील यांनी काढला.

खडसेंच्या ‘ED ला CD’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कायमच अग्रणी असतात. या दोघांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद सुरूच असतात. आजही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना शाब्दिक चिमटा काढला. ‘चंद्रकांतदादा, तुम्ही कोल्हापूरला या… जनता तुमचीच वाट पाहत आहे….’ असं मिस्कीलपणे ते म्हणाले.