कोल्हापूर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे शुR वारी कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. दसरा चौकात त्यांचे आगमन झाल्यावर ‘महाराष्ट्र का नेता कैसा हो चंद्रकांतदादा जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाटील यांनी अभिवादन केले.

चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांंत आमदार, मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष अशी प्रगतीची चढती कमान ठेवली आहे. त्यांच्याकडे पक्ष संघटनेतील सर्वोच्च पद  मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांंना आनंद झाला. पाटील यांच्या स्वागतासाठी एक वाजल्यापासून कार्यकर्ते गटागटाने दसरा चौकात थांबले होते. पक्षाचे ध्वज, सायलन्सर काढलेल्या मोटारसायकलींचा ताफा होता.

लाडक्या दादांचे दसरा चौकात आगमन झाल्यावर घोषणाबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. भाजपाचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पुष्पहार घातल्यानंतर कार्यकर्त्यांंनी एकच जल्लोष केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा  शौमिका महाडिक, नगरसेवक अजित ठाणेकर, बाबा इंदुलकर पदाधिकाऱ्यांसह अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.