दयानंद लिपारे

गेली ५८ वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळ दूध संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. येत्या रविवारी मतदान होणाऱ्या या संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विद्यमान सत्ताधारी आणि विरोधक यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. गेली ३० वर्षे सत्ता भूषविणारे विद्यमान सत्ताधारी सत्ता अबाधित राखणार की सत्ता परिवर्तन होणार यांचीच सर्वत्र उत्सुकता आहे.

१९६०च्या दशकात राज्यात पुरेशा प्रमाणात दुधाची उपलब्धता नव्हती. दुधासाठी धावपळ करावी लागण्याचा तो काळ. रेशनप्रमाणे दूध केंद्रावर लांबलचक रांगा लागलेल्या असायच्या. दुधाचे महत्त्व जाणून याच काळात दुधाचा महापूर योजना राबवली गेली. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्याचा ‘कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ’ दिवगंत नेते आनंदराव पाटील चुयेकर यांनी स्थापन केला. प्रारंभीच्या काळात दूध संकलन अल्प होते. टप्प्याटप्प्याने ते वाढत गेले. १९८६ मध्ये दोन लाख लिटर दूध संकलन होत होते.

गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये सरासरी दूध संकलन वाढ दहा टक्केप्रमाणे वाढत आहे. आता उन्हाळ्यात दूध संकलन १२ लाख लिटर आहे. दरमहा १५० कोटी रुपये दूध उत्पादकांच्या घरी जातात. श्वेतक्रांतीची ही अर्थक्रांती ठरली. सन २०१५-१६ मध्ये वार्षिक उलाढाल १७२८ कोटी होती. आता ती अडीच हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. संघाला १४ वेळेला राष्ट्रीय उत्पादकता, राज्य शासनाचा सहकार भूषण पुरस्कार दोन वेळा प्राप्त झाला आहे. महालक्ष्मी पशुखाद्य, वासरू संगोपन, गोकुळ ग्राम विकास योजना, स्वच्छ दूध अभियान, प्रशिक्षण असे उपक्रम राबवत दर्जेदार दूधनिर्मितीला प्राधान्य दिले. ‘गोकुळ’ या नाममुद्रेने दूध आणि दुग्धोत्पादने लोकप्रिय होत गेली. संस्थेने कालानुरूप बदल करीत विस्तारीकरण केले. सरासरी १४ लाख लिटर दूध संकलन होत असते. मुंबई-पुणे या महानगरात गोकुळचे दूध हातोहात विकले जाते. गुजरातमधील अमूल दूध संघाला यशोशिखरावर नेणारे वर्गिस कुरियन यांनी केलेल्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे गोकुळचा विकास घडून आला. गोकुळच्या श्रेयाचे तेही खरे मानकरी आहेत. संघाने २० लाख लिटर विस्तारीकरणाचा प्रकल्पही हाती घेतला आहे. ८५ टक्के दूध पिशवीतून विकले जाते, तर उर्वरित दुधापासून दुग्ध पदार्थ बनवले जातात. हे समीकरण बदलून दूध विक्रीपेक्षा दुग्ध पदार्थ अधिक बनवले तर मूल्यवर्धिततेचा अधिक लाभ मिळणे शक्य असल्याच्या कुरियन यांच्या शिकवणीकडे संचालक मंडळाचे दुर्लक्ष झाले.

विस्तारीकरणाला राजकीय फोडणी

गोकुळचे विस्तारीकरण होत असताना दुसरीकडे त्याला राजकीय फोडणी मिळाली. २० लाख लिटर दूध संकलन करायचे असेल तर केवळ कोल्हापूर जिल्हापुरते क्षेत्र ठेवून चालणार नाही. परिसरातील जिल्हे, शेजारचे कर्नाटक या दुभत्या भागातून दूध संकलन करणे संचालक मंडळांना गरजेचे वाटू लागले. त्यातूनच गोकुळ हा बहुराज्य दूध संघ करण्याची संकल्पना पुढे आली. आधीच गोकुळच्या गैरकारभारावर विरोधी कृती समितीने समितीने गेल्या निवडणुकीपासून आगपाखड सुरू केली होती. त्यात बहुराज्यचे आयते कोलीत मिळाल्याने हा मुद्दा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री  हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी तापवत ठेवला.

आताच्या निवडणुकीच्या आखाड्यात तो ऐरणीवर आला आहे. संघ बहुराज्य झाल्याने गावोगावच्या दूध उत्पादक संघाचे अस्तित्व नामशेष होण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. गोकुळचे सध्या ३५०० सभासद आहेत. प्रत्येक संस्थेचा एक ठरावधारक प्रतिनिधी मतदान करणार आहे. यामुळे अन्य जिल्ह्यातील सोयीचे सभासद वाढवले जातील आणि त्यातून ही संस्था ठरावीक लोकांची मक्तेदारी मिळेल असा प्रचार होत आहे. या मुद्द्याभोवती आणि गोकुळचे मुख्य नेतृत्व करणारे महादेवराव महाडिक यांच्या विरोधी वातावरण करण्यावर विरोधकांचा भर आहे. सत्तारूढ गटाचे दुसरे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलले गेले. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आली. प्रदीर्घ वाटचालीत नियमित देयके देताना ४०० कोटींहून अधिक ठेवी जमा केल्याचा मुद्दा हिरिरीने मांडत विरोधकांवर हल्ला चढवला आहे.

करोना अडथळा; मतदारांची बडदास्त

जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे गोकुळची निवडणूक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेली. सत्तारूढ गटाने अशा बिकट परिस्थितीत निवडणूक होऊ नये अशी भूमिका मांडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यास अनुमती देताना मतदान केंद्रात वाढ करण्यास सांगितले आहे. पूर्वी जिल्ह्यात एकाच ठिकाणी मतदान होत असे. या वेळी आधीच्या नियोजनाप्रमाणे ते जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रात होणार होते. आता ते ७० केंद्रात होणार आहे.

करोना नियमावलीचे पालन करीत मतदान होणार आहे. यासाठी मतदान यंत्रणा व बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक मताचे लाखमोलाचे महत्त्व जाणून, त्याची किंमत मोजून हजारो ठरावधारकांची जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट येथे बडदास्त केली आहे. रविवारी ते कोणाच्या बाजूने मोहर उमटवणार यावर सत्तारंग अवलंबून राहील.