30 May 2020

News Flash

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे करवीरनगरीत स्वागत

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर निवड झाल्याने शनिवार रात्रीपासूनच शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता.

राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे करवीरच्या जनतेने स्वागत केले. जिल्ह्य़ाला तिसरा खासदार छत्रपती घराण्यातील मिळाल्याचा आनंद गुलालात न्हाऊन निघालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तरळत होता. नवीन राजवाडा, जुना राजवाडा , शिवाजी चौक , महालक्ष्मी मंदिर , तुळजाभवानी मंदिर अशा ठिकाणी रविवारी दिवाळीचा आनंद होता. तर,  छत्रपती घराण्याचे राजकीय पुनर्वसन झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या छत्रपती प्रेमींनी दसऱ्याचे सोने लुटले. या जल्लोषी वातावरणात  छत्रपती  कुटुंबातील सर्व सदस्य समरसतेने सहभागी झाले होते.

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर निवड झाल्याने शनिवार रात्रीपासूनच शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता. छत्रपती संभाजीराजे हे बाहेरगावी असल्याने त्यांना भेटण्याची संधी मिळाली नव्हती. रविवारी सकाळी न्यू पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे आगमन झाल्यावर त्यांचा जयघोष करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी श्रीमंत शाहू महाराज, श्रीमंत महाराणी याज्ञसेनी महाराज,  छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे, युवराज मालोजी राजे, मधुरिमा राजे , युवराज शहाजीराजे, युवराज यशराजे राजवाड्याच्या प्रवेशद्वारात उभे होते. खासदारकीचा टिळा भाळी लागलेल्या  छत्रपती संभाजीराजे यांना कुंकुमतिलक लावून औक्षण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. गुलालाची उधळण करण्यात आली.

स्वागताचा हा कार्यक्रम झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी, िबदू चौकातील फुले , शाहू, आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर , जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिर येथे त्यांनी विधिवत पूजा केली. येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर  ते रायगडला रवाना झाले. तेथून मुंबई, नवी दिल्ली असा दौरा आहे.

निवडीविषयी बोलताना  छत्रपती संभाजीराजे म्हणाले, शिव – शाहूंचा विचार देशभर तेवता  ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील. कोल्हापूरचे प्रश्न राज्यसभेत मांडण्याची संधी जिल्ह्याला प्रथमच मिळाली असल्याने त्याचा फायदा मिळवून दिला जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिल्याने मी त्यांचा आभारी आहे. राज्यसभेवर नियुक्ती  होण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणारा नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 2:02 am

Web Title: chhatrapati sambhaji raje
Next Stories
1 ऐतिहासिक मोती तलाव बुजविण्याचे काम सुरू
2 ‘भारताच्या भवितव्यासाठी नदीजोड प्रकल्प आवश्यक’
3 छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची खासदारकी
Just Now!
X