केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत कोल्हापूर शहर शंभर टक्के स्वच्छ झाल्याचे महापौर अश्विनी रामाणे यांनी जाहीर केले. राज्य सरकारला २६ जानेवारीपर्यंत कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त करू, हे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे महापौर रामाणे यांनी म्हटले आहे. भविष्यातही शहरात कोणीही उघडय़ावर शौचास बसणार नाही याबाबत सर्वानी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शहरात झालेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील ९५  हजार रहिवासी कुटुंबांपकी ७८ हजार ३३० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत, तर  १६ हजार ६७० कुटुंबे ही सार्वजनिक तसेच शेजारील शौचालयांचा वापर करतात. अशा कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून चार हजार रुपये, राज्य शासनाकडून आठ हजार रुपये व महापालिकेकडून तीन हजार रुपये असे एकत्रित १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. शहरातील नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम मनपाकडून राबविण्याचे निश्चित झाले आहे.
‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ तत्त्वावर शहरात गरजेच्या ठिकाणी शौचालय बांधण्याची बाबही विचाराधीन आहे. शौचालयांची सुविधा उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणांवर मनपा मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करून देऊन ही ठिकाणे हागणदारीमुक्त केलेली आहेत. येथून पुढे उघडय़ावर शौचास बसल्याचे निदर्शनास आल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाची ११ ‘गुड मॉìनग’ पथके कार्यान्वित केलेली आहेत.