आघाडी सरकारने मलिदा सुरू ठेवण्यासाठी टोल सुरू ठेवला होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ते कोल्हापूर येथे पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते. टोल बंद करण्याचे जे काम आघाडी सरकारने १५ वर्षांत केले नाही ते आम्ही अवघ्या सहा महिन्यांत केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर शरसंधान केले.

आर्थिक हेतूंना टाच येईल म्हणून कोल्हापूरातील टोल आजवर बंद करण्यात आघाडी सरकार दिरंगाई करत होते पण आमची सत्ता येताच पहिल्या सहा महिन्यांत राज्यातील ६४ टोलनाके बंद करून दाखवले. गेल्या वर्षभराचा हिशोब मागणाऱयांनी राज्यात गेल्या १५ वर्षांत जी घाण केली त्यावर आधी बोलावे, असे फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले. हजारो कोटींचे घोटाळे करून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱयांना आमच्या सरकारच्या वर्षभराच्या कारभारवर बोलण्याचा अधिकारच नाही.

आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटी खर्चून एक टक्काही जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही पण मी मुख्यमंत्री होताच वर्षभरात ९ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. गेल्या अनेक वर्षांपासून शहरांच्या विकासाचे रखडलेले आराखडे मी सहा महिन्यांत मंजूर केले. आज एकही विकास आराखडा प्रलंबित नसल्याचा दावा देखील फडणवीस यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात यावेळी सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांचीही माहिती दिली. नागपूर महापालिकेच्या विकास कामांचा दाखला देखील मुख्यमंत्र्यांनी दिला.