News Flash

मुख्यमंत्र्यांकडून विकासाचा प्रचार, तर शिवसेनेकडून सरकारवर टीका!

. निवडणुकीचे वारे खेळू लागल्याची प्रचिती या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आली.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना त्यावर डोळा ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दोनदिवसीय कोल्हापूर दौरा पार पडला. दोघेही सत्तेतील प्रमुखांनी या निवडणुकांमध्ये सत्ता आपल्या पक्षाकडे यावी यासाठी प्रभावी मांडणी केली, पण दोघांच्याही मांडणीतील पद्धत मात्र भिन्न अन टोकाची राहिली. फडणवीस यांनी राज्य शासनाच्या विकासकामांचा आलेख मांडत राज्याची सर्वागीण प्रगती कशी होत आहे, यावर भर दिला. तर उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत राज्य शासनाच्या एकूण एक धोरणांवर टीकेचे आसूड ओढत राहणे पसंत केले. सत्तेतील या दोघा प्रमुखांकडून कोल्हापूर जिल्ह्य़ातील जनतेच्या विकासाकडून भरघोस अपेक्षा असताना त्यावर मात्र उभयतांनी बोलण्याचे खुबीने टाळले. दोघा दिगज्जांचा सलग दोन दिवसांचा दौरा असतानाही एकही प्रभावी स्थानिक नेता ना भाजपत प्रवेश करण्यास धजावला, ना शिवबंधनात अडकला. यामुळे सत्ताधाऱ्यांकडे झुकण्याच्या प्रकारास प्रथमच गतिरोध मिळाल्याने या स्थितीचाही दोन्ही पक्षांवर विचार करण्याची वेळ आल्याचे जाणवले.

पुरोगामी विचारांचा जिल्हा अशी प्रतिमा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ात गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून भगवा डौलाने फडकू लागला आहे. विधानसभेत शिवसेनेने तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. परिणामी काँग्रेस-राष्ट्रवादी या कायम सत्तेत राहणाऱ्या पक्षांची मोठी पीछेहाट झाली. हे चित्र कायम असताना कोल्हापूर जिल्ह्य़ावर आपल्या पक्षाच्या प्रभावाची झाक अधिक प्रखरपणे उमटावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि सेना प्रमुख ठाकरे यांनी कोल्हापूरची वाट धरली. दोघांच्याही दौऱ्यात आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या पदरात मतदानाचे दान टाकण्याचे आवाहन केले. किंबहुना, निवडणूक प्रचारास अवधी असला तरी आत्तापासूनच भाजप व शिवसेनेच्या या दोघा प्रमुखांची प्रचाराची कंबर कसली असल्याचे दिसून आले. हे केवळ कोल्हापूर जिल्ह्य़ातच नव्हे तर लगतच्या सांगली, सातारा जिल्हय़ातही स्पष्टपणे दिसून आले. निवडणुकीचे वारे खेळू लागल्याची प्रचिती या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आली.

मुख्यमंत्र्यांचाही प्रचार

मुख्यमंत्र्यांचा भर निवडक कार्यक्रमावर राहिला. पहिल्याच दिवशी वारणानगर येथे महायुतीतील नवाभिडू, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याशी संवाद साधत लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आखणीची चर्चा केली. तर मुख्यमंत्री दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या बाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे देत संदेह कमी केला. कृषी कर्जमाफी होणार की नाही या विषयी उभय काँग्रेससह शिवसेनेने डांगोरा पिटण्यास सुरुवात केली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी साडेपंधरा लाख शेतकर्याची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असल्याचे स्पष्ट केले.

पंधरवडय़ाभरात सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितल्यावर उपस्थित शेतकऱ्यांचे चेहरेही फुलले. याच वेळी मुख्यमंत्र्यांनी शिक्षण, स्वयंरोजगार, पर्यटन, जलयुक्त शिवार, ऊस-दूध उत्पादकांचे प्रश्न अशा महत्त्वाच्या डझनभर प्रश्नांना भिडत याबाबतीत राज्य शासन कशी प्रभावीपणे कामगिरी होत आहे याची मांडणी केली. तर म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या बँकेच्या कार्यक्रमप्रसंगी राज्य शासन सहकारातील अनिष्ट प्रवृत्तीचे निर्दालन करीत असून सहकारातील चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन कशा प्रकारे देत आहे, याची मीमांसा केली. याच वेळी त्यांनी समरजितसिहं घाटगे यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे संकेत देत आमदार हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले. तथापि, फडणवीस यांनी विरोधकांवर टोकाची टीका करण्याचे टाळले. तर उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या कारभाराचे वाभाडे काढल्याचे कानावर येऊनही त्यास अनुल्लेखाने मारले.

विकासाचे प्रश्न टांगतेच

सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या विकासाची हमी भाजपचे सरकार घेईल, असे अनेकदा प्रचारसभांमध्ये बोलून दाखवले होते. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत भाजपची सत्ता येऊनही कोल्हापूर जिल्हय़ातील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री घोषणा करतील, रेंगाळलेल्या प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद करतील अशी अपेक्षा उंचावली होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात भ्रमनिरास झाला. कोल्हापुरातील रस्ता प्रकल्प, खंडपीठ, विमानतळ, चित्रनगरी, विभागीय क्रीडा संकुल, राजर्षी शाहू महाराज स्मारक, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती असे अनेक प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत आहेत. पण याबाबत मुख्यमंत्र्यांनी अवाक्षरही काढले नाही.

पक्ष-प्रवेशाला गतिरोध

राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असल्याने या पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे गेल्या तीन वर्षांत दिसून आले. भाजपकडे तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयारामांची मोठी रांगच लागली होती. भाजप इतक्या प्रमाणात नसले तरी काहींनी शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले होते. हा पक्ष-प्रवेशाचा कल पाहता फडणवीस व ठाकरे या दोघा दिगज्ज नेत्यांच्या काही प्रमुखांची दौऱ्यात पक्ष प्रवेश झोकात होईल असे वाटत होते. पण, नाव घ्यावे अशा कोणाचाही पक्ष-प्रवेश झाला नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या महिन्यात जिह्य़ातील शक्तिमान असामी भाजपच येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात जिल्ह्य़ातील या बडय़ा असामीचा प्रवेश होईल असे वाटत होते पण या पातळीवरही काही घडू शकले नाही. राज्यातील सर्वच क्षेत्रांत प्रगती होत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून होत असला तरी राज्यातील सामान्य जनतेच्या आशा मात्र फोल ठरत असल्याने सत्ताधारी पक्षात प्रवेश करणारे काहीसे सावध झाले असल्याचे यानिमित्ताने ठळकपणे दिसून आले. पक्ष-प्रवेशाला निर्माण झालेला हा गतिरोध सत्ताधाऱ्यांना विचारात पाडणारा आहे.

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

शिवसेना ही राज्याच्या सत्तेतील दुसऱ्या क्रमांकाची भागीदार. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करणे हे सेनेकडून अपेक्षित धरले जाते. पण, याचा विरुद्ध अनुभव राज्यातील जनतेला सातत्याने येत आहे. सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यात त्यांच्यातील विरोधकाचेच दर्शन झाले. राज्यातील सर्व समस्यांना केंद्र व राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार जबाबदार आहे, असे टीकास्त्र ते डझनभर कार्यक्रमात डागत राहिले. कृषी कर्जमाफी, व्यापारी-उद्योजकांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था स्थिती अशा अनेक मुद्दय़ांचा समाचार घेताना त्यांनी प्रामुख्याने भाजपला दूषणे देण्यावर भर ठेवला. तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधकांवरील टीकेची धार मात्र काहीशी बोथट राहिली.

सेनेच्या मंत्रिपदाला हुलकावणी

कोल्हापूर जिल्ह्य़ात शिवसेनेचे सर्वाधिक सहा आमदार आहेत. आमदार निवडून देण्यात मुंबईनंतर क्रमांक लागतो तो कोल्हापूरचा. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्य़ाला मंत्रिपद द्यावे यासाठी सातत्याने आग्रह धरला जातो. हाच मुद्दा अनेक सभा, संवाद कार्यक्रमप्रसंगी ठाकरे यांच्यासमोर उपस्थित झाला. पण त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ाला मंत्रिपद देण्याच्या मुद्दय़ाला बगल दिली. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये निराशा पसरली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पार्सल असा उल्लेख करून त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्य़ाचा एक तरी प्रश्न सुटला का, असा सवाल करीत ठाकरे यांनी राज्य सेनेच्या हाती येईल तेव्हा कोल्हापूरला मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगून इच्छुकांची बोळवण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:32 am

Web Title: cm devendra fadnavis shiv sena uddhav thackeray maharashtra government
Next Stories
1 साडेपंधरा लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2 शरद पवार – मुख्यमंत्री भेटीवर उद्धव यांची टीका
3 दौऱ्यांची वेळ एकच, आव्हाने वेगळी
Just Now!
X