05 April 2020

News Flash

स्वस्त धान्य दुकानांमधून अन्य किराणा माल घेण्याची सक्ती

ग्राहकांच्या तक्रारी, शासनाच्या परवानगीचा दुकानदारांकडून गैरफायदा

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

रास्त भाव धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना किमान उदरनिर्वाह व्हावा यासाठी किराणा माल धर्तीवर काही वस्तू विकण्याची परवानगी राज्यशासनाने या आठवडय़ात दिली आहे. याचा गैरफायदा घेत काही दुकानदारांनी स्वस्त धान्य धान्याची विक्री करतानाच किराणा माल घेण्याची सक्ती सुरू केली आहे. काही वस्तू चढय़ा दराने विकण्यास सुरुवात केल्याने सामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होऊ लागल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून घरगुती वापराच्या धान्य, तेल, साखर आदी वस्तू स्वस्त भावात ग्राहकांना मिळत असतात. गरीब, कनिष्ठ  मध्यमवर्गीय यांना याचा मोठा आधार असतो. मात्र अशा धान्य विक्रीतून पुरेसा आर्थिक लाभ होत नाही, अशी तक्रार करीत स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडे लढा दिला होता.  याची दखल घेऊन शासनाने त्यांना काही वस्तू विकण्यास परवानगी दिली आहे.

९ मार्च रोजी नागरी अन्न पुरवठा व व ग्राहक संरक्षण विभागाने शासन निर्णय घेवून खुल्या बाजारातील इतर वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार गव्हाच्या ४ जाती, तांदळाच्या बासमतीसह ११ जाती, खाद्यतेल, पामतेल, कडधान्य, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ, भाजीपाला, प्रमाणित बी—बियाणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खादी ग्रामोद्योग संघाची उत्पादने, स्टेशनरी व शालोपयोगी साहित्य या वस्तू विकण्यास परवानगी दिली आहे.

अपप्रवृत्ती फोफावली

शासनाच्या या निर्णयाचा आधार घेत काही दुकानदारांमध्ये अपप्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. त्यांनी शिधापत्रिकेवर दिले जाणारे धान्य हवे असेल तर नव्याने उपलब्ध झालेले किराणा साहित्य घेण्याची सक्ती सुरू केली आहे. २८ रुपये किलो असणारी ज्वारी ३० रुपये किलोने किमान ५ किलो घेतली पाहिजे असा दबाव ते ग्राहकांवर घालत आहेत. परिपत्रकात नसलेल्या काही वस्तूही ते ग्राहकांना घेण्यास भाग पाडत आहेत. या वस्तू  कमाल विक्रीकिमती पेक्षा कमी दराने विकत असल्याचे दुकानदार ग्राहकांना सांगत आहेत. पण किंमत कमी असली तरी मालाच्या दुय्यम दर्जामुळे ग्राहक अशा वस्तू नाकारत आहेत. त्यातून शिधापत्रिकाधारक आणि दुकानदार यांच्यात वाद होत आहे.  दुकानदार ग्राहकांना नेहमी विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूही नाकारत आहेत.

विक्रेत्यांनी काळजी घ्यावी

शासनाने किराणा माल विकण्याची परवानगी दिल्याने दिलासा मिळाला आहे.  त्याचे योग्य पालन बहुतेक दुकानदार करत आहेत. कोणी गैरप्रकार करत असेल तर त्यांनी शासकीय कारवाई होईपर्यंत प्रतीक्षा करू नये, असे मत जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त केले.

परवाना रद्द व्हावा

सर्वसामान्य ग्राहकांना दुकानदारांकडून जबरदस्तीने किराणामालाची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गॅस सिलेंडर विक्री करताना त्यासोबत शेगडी, चहा पावडर अशा वस्तू गळ्यात घालणाऱ्या डिलर्सचे परवाने रद्द झाले होते. या धर्तीवर ग्राहकांची कोंडी करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी राज्य ग्राहक संरक्षण समितीचे माजी सदस्य, ग्राहक चळवळीचे संजय पाटील यांनी केली आहे.

दुकानदारांवर कारवाई होणार

स्वस्त भाव दुकानदारांना त्यांचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे व्हावा यासाठी काही किराणामाल वस्तू विकण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शासनाच्या यादीत, नियमात असलेल्या वस्तुंची विहित दरानेच विक्री केली पाहिजे. त्याचे उल्लंघन केल्यास दुकानदारांवर कारवाई केली जाईल. याबाबत पुरवठा विभागाकडे तक्रार करावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवतिके यांनी आज ‘लोकसत्ता‘ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:21 am

Web Title: compulsion to pick up other groceries from cheap grain shops abn 97
Next Stories
1 सामान्य यंत्रमागधारक बेदखल!
2 Coronavirus: जायचं होतं घरी पण वाट पत्करावी लागली रुग्णालयाची!
3 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही – जिल्हाधिकारी
Just Now!
X