News Flash

साखरनिर्मितीला ‘कीड’

कोल्हापुरातील प्रमुख नेत्यांच्या कारखान्यांची अवस्था बिकट

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

सर्वाधिक साखर उतारा, या अनुषंगाने तीन हजाराच्या आसपास प्रतिटन मिळणारा दर, वेळेत मिळणारी उसाची देयके, ऊस शेतीसाठी पूरक सुविधा अशा अनेक चांगल्या बाबी असल्याने कोल्हापुरातील साखर कारखानदारीचा गोडवा निर्माण झाला आहे. हे चित्र एकीकडे निर्माण झाले असताना दुसरीकडे जिल्ह्य़ातील प्रमुख नेत्यांच्या साखर कारखान्यांना घरघर लागल्याची चित्र आहे. गडहिंग्लज, चंदगड, आजरा, तांबाळे, शाहूवाडी,पंचगंगा, आसुर्ले आदी साखर कारखान्यांची अवस्था बिकट बनली.

राज्यातील सहकारी साखर कारखानदारीचे चित्र सुखावह नाही. दोनशेवर कारखाने राज्यात असले तरी त्यातील निम्म्याहून अधिक कारखाने हे भाडय़ाने, काही अवसायनात तर काहींची विक्री झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये साखर कारखानदारी चांगल्या प्रकारे चालली. जिल्ह्य़ातील नेत्यांनी एकमेकांच्या स्पर्धेतून १९६०च्या दशकापासून साखर कारखाने उभारणीची मालिका येथे सुरू झाली. हा प्रवास इतका वाढत गेला की अलीकडे कागल तालुक्यातील चारही प्रमुख नेत्यांचे कारखाने सुरू झाले आहेत. हे आशादायक चित्र असताना भ्रष्ट कारभार, गैरव्यवहार, अंतर्गत राजकारण यामुळे कारखाने बंद पडण्याचे प्रकार घडले.

या हंगामात हे चित्र आणखी ठळक बनले आहे. गडहिंग्लज येथील सहकारी साखर कारखान्याचे जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव शिंदे एकेकाळी अध्यक्ष होते. अविश्वास ठराव होण्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. आर्थिकदृष्टय़ा कारखाना अडचणीत आल्यावर ‘ब्रिस्क फॅसिलिटी कंपनीने’ तो दहा वर्षांसाठी चालवण्यास घेतला. माजी संचालक, निवृत्त कर्मचारी यांनी अडचणी निर्माण केल्यामुळे दोन वर्ष अगोदरच तो सोडून देणार असल्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच घोषित केले आहे. कारखान्याची निवडणूक तोंडावर असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय धाडसी तितकाच खळबळ उडवून देणारा ठरला आहे.

आजरा साखर कारखाना तालुक्यातील भाजपचे नेते अशोक चराटे चालवत होते. आर्थिक गणित बिघडल्याने तो बंद पडला आहे. गवसे येथील हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीत झाला आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बँकेची १०४ कोटी रुपयांची थकबाकी आणि अन्य अशी २०७ कोटी रुपयांचा डोंगर अंगावर असल्याने कारखाना चालवणे हे कडवे आव्हान बनले आहे.

जिल्ह्य़ाच्या दक्षिणेला, दुर्गम भागात तीन दशकाहून अधिक काळ सुरू असणाऱ्या हलकर्णी येथील दौलत कारखान्याची अशीच दुरवस्था झाली. माजी आमदार नरसिंग पाटील व कार्यकारी संचालक गोपाळ पाटील या मेहुण्या-पाहुण्यांच्या संघर्षांतून कारखाना डबघाईला आला. जिल्हा बँक, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, केंद्र शासनाचा साखर निधी तसेच अन्य देणी, कर्मचारी पगार अशी तब्बल ३२८ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोज्याची ‘दौलत’ पेलणे हे कर्मकठीण होते. जुलै २०१६ मध्ये दौलत कारखाना गोकाक येथील ‘न्यूट्रियन्टस् अ‍ॅग्रो फ्रूड्स’ कंपनीला ४५ वर्षांच्या मुदतीने भाडेतत्त्वावर दिला होता. न्यायालयीन वादानंतर जिल्हा बँकेने दौलत ताब्यात घेऊन भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला.

बांबवडे (शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी स्वप्निल पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये केली. काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या नावाचा हा कारखाना त्यांचे पुत्र, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड चालवत होते. जन्मापासून आजारी असणारा हा कारखाना जिल्हा बँकेच्या मदतीतून कसाबसा तगला. अर्थकारण बिघडलेला हा कारखाना सन २०१४ पासून राज्य सहकारी बँकेने कर्नाटकातील अथणी शुगर्स या खाजगी कारखान्यास भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. नंतर तो रेणुका शुगर्स, विश्वासराव नाईक, बेळगावच्या कुमुदा शुगर्स यांना चालवण्यास देण्यात आला होता.

देशातील पहिला महिला कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबाळे (ता.भुदरगड) येथील इंदिरा गांधी महिला सहकारी साखर कारखाना सन २००३ -२००४ च्या हंगामात स्वबळावर ऊस गाळप सुरू केले होते. संचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे तो लवकरच बंद करावा लागला. गोदावरी शुगर्स यांना भाडेतत्वावर चालविण्यास दिला तरी अंतर्गत मतभेद उफाळले. संचालक मंडळाने कारखाना स्वत:च्या ताब्यात घेऊन एक वर्ष चालविला. अडचणी वाढल्यावर शक्ती शुगर्स (तमिळनाडू) या खासगी कंपनीस भाडेतत्त्वावर दिल्यावर पुन्हा कटुता निर्माण झाली. तीन वर्षे कारखाना बंद राहिला. जिल्हा बँक, आयडीबीआय बँक या ११४ कोटीचे कर्ज थकीत राहिले. आयडीबीआय बँकेने कारखान्याची मालमत्ता सीलबंद केली. आता अथणी शुगर कंपनी कारखाना चालवत आहे. इतकेच नव्हे जिल्ह्य़ाची सूत्रे हाताळणारे रत्नाप्पा कुंभार यांचा पंचगंगा (रेणुका), आसुर्ले पोर्ले (दालमिया) हे मोठे कारखाने आर्थिक बेशिस्तीमुळे खासगी कंपनीकडे गेले असून संचालक हताशपणे हात चोळीत बसले आहेत.

भ्रष्ट कारभार, गैरव्यवहार, अंतर्गत राजकारण

* नेत्यांनी एकमेकांच्या स्पर्धेतून १९६०च्या दशकापासून साखर कारखाने उभारणीची मालिका येथे सुरू झाली. हा प्रवास इतका वाढत गेला की अलीकडे कागल तालुक्यातील चारही प्रमुख नेत्यांचे कारखाने सुरू झाले आहेत.

* हे आशादायक चित्र असताना भ्रष्ट कारभार, गैरव्यवहार, अंतर्गत राजकारण यामुळे कारखाने बंद पडण्याचे प्रकार घडले.

* भ्रष्ट कारभार, गैरव्यवहार, अंतर्गत राजकारण इत्यादी कारणांमुळे गडहिंग्लज, चंदगड, आजरा, तांबाळे, शाहूवाडी, पंचगंगा, आसुर्ले कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:06 am

Web Title: condition of the sugar factories of the prominent leaders in kolhapur is dire abn 97
Next Stories
1 वस्त्रोद्योगात विविध घटकांमध्ये बेबनाव
2 घोषणांचा सुकाळ कृतीचा दुष्काळ
3 वस्त्रोद्योगाच्या प्रश्नांवर बैठकांचा सपाटा; उद्योजकांचे अंमलबजावणीकडे लक्ष 
Just Now!
X