महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून सर्व पदे ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यावीत, भाजप त्यास बाहेरून पाठिंबा देईल त्यासाठी सहकार्य करावे, असा प्रस्ताव भाजपकडून आला होता. परंतु विश्वासार्हतेच्या प्रश्नामुळेच हे घडू शकले नाही, असा खुलासा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
महापौर करण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न सोडून दिल्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे, की महापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे वक्तव्य पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. त्याबाबत पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी जी भूमिका घेतली त्याचे स्वागत आहे. अध्यात्म व चमत्कार हे शब्द कानावर येताच मी संभ्रमित झालो होतो. घोडेबाजाराचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. जर दादांची मनापासून ही भूमिका असेल तर सत्तारूढ आघाडीबरोबर शहराच्या विकासासाठी व इतर प्रकल्प आणण्यासाठी मनापासून साथ द्यावी. त्याचे श्रेय त्यांनाच देऊ. शासनाकडून निधी आणण्याकरिता आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. नगरसेवकांमध्ये भेदाभेद केला जाणार नाही.
चंद्रकांत पाटील हे भला व चांगला माणूस आहे. परंतु काही शक्ती मतभेद व गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करत असतात. महापौर निवडणूक बिनविरोध करतील. शहराच्या विकासासाठी प्रचंड निधी आणतील, असा माझा विश्वास आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.