विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन महिन्यांत दुसऱ्यांदा जल्लोष साजरा केला. महापालिका निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी भरभक्कम यश मिळवल्याने करवीरनगरीसह अवघ्या जिल्हय़ात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी आणि डॉल्बीच्या दणदणाटात नृत्याचा ठेका धरीत आनंद साजरा केला. काँग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादी, जनसुराज्य व शिवसेनेच्या एका गटातूनही जल्लोष केला गेला. शहरात विविध ठिकाणी सतेज पाटील यांचे वेगवेगळय़ा रूपातील फ्लेक्स उभे करून आनंद व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. यामुळे काँग्रेस पक्षाची राजकीय पीछेहाट झाली होती. कार्यकर्त्यांमध्येही मरगळ निर्माण झाली होती. मरगळ झटकून टाकत सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत लक्ष घातले. पण तेथेही पराभव वाटय़ाला आला, मात्र पराभवाचे सत्र महापालिका निवडणुकीवेळी संपवण्यात पाटील यांना यश आल्याने जल्लोष साजरा करण्याची संधी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रथमच मिळाली. या घटनेला दोन महिने पूर्ण होत असतानाच बुधवारी विधानपरिषद निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर व भाजप पुरस्कृत महादेवराव महाडिक यांचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत पाटील व महाडिक या दोघांचेही राजकीय भवितव्य ठरणार होते. अशा कसोटीच्या वेळी पाटील यांनी विजय प्राप्त केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना आनंदाला उधाण आले.
निकाल लागल्यावर लगेचच शासकीय तंत्रनिकेतनमध्येच गुलालाची उधळण करण्यात आली. तेथून ते पाटील राहात असलेल्या कसबा बावडा परिसरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मार्गात अखंडपणे गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी होत राहिली. बावडय़ामधील पाटील समर्थकांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. समर्थकांची संख्या पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. येथेच डॉल्बीच्या दणदणाटात कार्यकर्त्यांनी नृत्याचा ठेका धरला. तसेच पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय असलेल्या अजिंक्यतारा या इमारतीसमोरही अखंडपणे जल्लोष केला जात होता. येथेच पाटील यांनी जिल्हय़ातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.