जातपडताळणी प्रमाणपत्रे वेळेत सादर केली नसल्याने महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह महानगरपालिकेचे २० नगरसेवक अडचणीत आले असताना त्याचा पहिला घाव महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती, काँग्रेस नगरसेविका  वृषाली  कदम आणि भाजप नगरसेवक संतोष गायकवाड यांना बसला असून, त्यांचा जातीचा दाखला बुधवारी अवैध ठरला.

विभागीय जातपडताळणी समितीने हे आदेश दिल्याने दोघांचेही नगरसेवकपद रद्द ठरणार आहे. महापालिका प्रशासन या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला कळवणार आहे. त्यानंतर प्रभागात पोटनिवडणूक लागेल.

दरम्यान, नगरसेवक नियाज खान, उपमहापौर शमा मुल्ला, विजय खाडे, स्वाती यवलुजे यांना मात्र जात प्रमाणपत्र वैध ठरल्याने दिलासा मिळाला आहे. दस्तुरखुद्द महापौर अश्विनी रामाणे, दीपा मगदूम, नीलेश देसाई, सचिन पाटील, अफजल पिरजादे, हसीना फरास, संदीप नेजदार यांच्यासह अन्य तिघा जणांवर जातपडताळणी समितीची टांगती तलवार आहे.

महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ रोजी झाली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या २२, तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ११ प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांना जातपडताळणी प्रमाणपत्र पुढील सहा महिन्यांत महानगरपालिकेला सादर करणे राज्य निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. ही मुदत शनिवारी सायंकाळी संपली आहे.

मात्र केवळ १३ नगरसेवकांनीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे, तर उर्वरित २० नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी विभागीय जातपडताळणी समितीसमोर सुरू आहे. निवडणूक आयोगाची मुदत संपली तरीही जातपडताळणी प्रमाणपत्र हातात पडले नसल्याने या नगरसेवकांची घालमेल वाढली आहे.  दरम्यान, याचा पहिला फटका नगरसेविका वृषाली कदम आणि नगरसेवक संतोष गायकवाड यांना बसला आहे, तर  नगसेविका अश्विनी बरामते, रीना कांबळे, मनीषा कुंभार आणि नगरसेवक सुभाष बुचडे, कमलाकर भोपळे या पाच जणांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र नगरविकास अधिकाऱ्याला दिले आहे. त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्राच्या कचाटय़ातून हे पाचही जण सहीसलामत सुटले आहेत.

अद्याप महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, नीलेश देसाई, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, नियाज खान, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम या १३ नगरसेवकांचे अद्याप जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.