23 February 2019

News Flash

कोल्हापूर काँग्रेसमध्ये ऐक्याचे वारे?

पक्षांतर्गत गटबाजीमुळे दहापैकी एकाही जागेवर आमदार निवडून आला नाही.

नेहमी पायात पाय अडकवून एकमेकांची जिरवणारे नेते हातात हात घालून ऐक्याचा संदेश देताना पाहून कार्यकर्त्यांमध्येही उमेदीची चेतना जागवली गेली.

कोल्हापूर : गटबाजीने पुरत्या होरपळलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते आता कुठे भानावर येऊ  लागले आहेत. गटबाजीला तिलांजली देत काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी केला. नेहमी पायात पाय अडकवून एकमेकांची जिरवणारे नेते हातात हात घालून ऐक्याचा संदेश देताना पाहून कार्यकर्त्यांमध्येही उमेदीची चेतना जागवली गेली. गटबाजीला रामराम केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे स्थान उंचावण्यास मदत होण्याची चिन्हे असली तरी काही प्रश्न उरतातच. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद, गोकुळचे मलईदार राजकारणाचे लागेबांधे, अस्तित्व पुसले गेलेल्या जवळपास निम्म्या तालुक्यांतील बांधणी ही आव्हाने आहेत.

कोल्हापूरकडे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी पाहिले जायचे. एकूण एक महत्त्वाची सत्तास्थाने काँग्रेसच्या हातात होती. अगदी राष्ट्रवादीचा उदय झाला तरी काँग्रेसचे महत्त्व आणि स्थान कायम होते. पण अंतर्गत गटबाजीने पक्ष पुरता पोखरला गेला. गटबाजीमुळे नेत्यांचे महत्त्व कमी झाले आणि कार्यकर्त्यांची फरफट सुरू झाली. याची काँग्रेसला फार मोठी किंमत मोजावी लागली. जिल्हा परिषद हातातून गेली.महत्त्वाच्या सहकारी संस्थांवरील सत्तानियंत्रण गमवावे लागले. जिल्हा बँक, नगरपालिका, काही साखर कारखाने विरोधकांच्या ताब्यात गेले, खासदार-आमदारकीही गेली.. इतके सारे अनर्थ एका गटबाजीमुळे घडले. परिस्थितीचे चटके बसू लागल्याने आता एकत्र येण्याची गरज भासू लागली. त्याला आगामी निवडणुकांचा संदर्भही कारणीभूत आहे.

नेत्यांचा एकोप्याचा संदेश

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसकडे सत्तास्थानी उंच झेप घेतलेल्या नेत्यांचा तोटा नाही. सध्या ज्यांच्याकडे प्रमुख नेते म्हणून पहिले जाते त्या सर्वानी मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. गेल्या सरकारमध्ये सतेज पाटील गृहराज्यमंत्री होते. त्यापूर्वी जयवंतराव आवळे सामाजिक न्यायमंत्री होते. खेरीज कल्लाप्पाण्णा आवाडे (उद्योग, नगरविकास राज्यमंत्री) आणि प्रकाश आवाडे (वस्त्रोद्योगमंत्री) या पिता-पुत्रांनी राज्याच्या सत्तेत आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय विद्यमान जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी विक्रमी काळ जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. आमदारकी मिळवताना शह-काटशहाचे राजकारण रंगात आले. आपला सत्तेतला मार्ग सुकर व्हावा आणि त्यात कोणाचा अडसर नसावा या हेतूने स्पर्धकांना स्पर्धेत येण्यापूर्वीच नामशेष करण्याची कुटिल खेळी खेळली गेली. ती इतकी पराकोटीला पोहोचली की, एकमेकांना संपवताना आपण आणि पक्षही कधी संपला हे कोणाच्याच लक्षात आले नाही. आणि जेव्हा भानावर आले तेव्हा फारच उशीर झाला.

पक्षांतर्गत गटबाजीमुळे दहापैकी एकाही जागेवर आमदार निवडून आला नाही. विधानपरिषदेत सतेज पाटील निवडून आल्याने पक्षाची थोडी तरी अब्रू राखली गेली.

आता, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत काँग्रेसची भक्कम बांधणी करण्याचा आणि गटबाजीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा काँग्रेस भवनातील सभागृहाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एकत्र आलेले पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे यांनी हातात हात गुंफून काँगेसची पुन्हा एकवार भक्कम गृहबांधणी करणारा एकोप्याचा संदेश कार्यकर्त्यांच्या साक्षीने दिला आहे. कार्यक्रमास अनुपस्थित असलेले सतेज पाटील यांनीही या ऐक्य प्रक्रियेत आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे. नेत्यांचा ‘तुझा गळा माझा गळा’ सुरू झाल्याचे पाहून मरगळलेल्या कार्यकर्त्यांतही हुरूप वाढीस लागला आहे.

दुसरी फळी अधांतरी

सतेज पाटील – पी. एन. पाटील वादात कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून गेले. आवळे -आवाडे यांनी एकमेकांना खो घालण्याच्या खेळीत हातकणंगले आणि इचलकरंजी मतदारसंघात विरोधकांना संधी मिळाली. आता हे चौघे एकत्र आले असल्याने त्याचा एकमेकांना आणि काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, अन्य सहा मतदारसंघांतील स्थानिक नेत्यांची, संभाव्य उमेदवारांची जबाबदारी कोण आणि कशी घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरोळमध्ये गणपतराव पाटील हे सोडले तर शाहूवाडी, कागल, राधानगरी, चंदगड येथे सक्षम उमेदवार शोधण्यापासून काँग्रेसला वाटचाल करावी लागणार आहे.

जिल्हाध्यक्ष आणि गोकुळ

प्रमुख नेत्यांनी समूहगान सुरू केले असले तरी काही वादाच्या मुद्दय़ांचे उत्तर मिळाल्याशिवाय ऐक्याचा मार्ग सहजी पुढे सरकणार नाही. जिल्हाध्यक्ष आणि गोकुळ हे त्यातील कळीचे मुद्दे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना पदत्याग करायचे नाही. हे पद मिळवण्यासाठी प्रकाश आवाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. सतेज पाटील यांचीही याबाबतची भूमिका महत्त्वाची आहे. या त्रिकोणी वादाचे पर्यवसान कसे होणार यावर पुढील राजरंग अवलंबून असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे मलईदार सत्ताकेंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ. गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक-पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. महाडिक हे सतेज पाटील यांचे प्रमुख राजकीय शत्रू. सतेज पाटील यांचे गोकुळवर सत्ता मिळवण्याचे स्वप्न आहे. तर, पी.एन. पाटील यांना महाडिक यांचा दोस्ताना गमवायचा नाही. सत्तेचा हाही त्रिकोण काँग्रेसच्या ऐक्यात अडथळा ठरणार आहे. त्यामुळे एकत्रित हात उंचावलेल्या नेत्यांकडून काही प्रश्नांची स्पष्ट, पारदर्शक उत्तरे अपेक्षित आहेत. ती दिल्याशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न राहिल्यास एक तर मार्गात अडखळणे होईल वा ठेच तरी लागेल. कटू अनुभवातून सुलाखून निघालेल्या नेत्यांनी ऐक्याच्या नांदीने हुरळून जाण्याऐवजी आपला मार्ग किती सुकर आणि त्यातील अडचणी किती कठीण आहेत, याकडे एकदा डोळे उघडून स्पष्टपणे पाहणे गरजेचे आहे.

First Published on August 7, 2018 3:10 am

Web Title: congress finished grouping in kolhapur