‘आमचं ठरलंय’ चा करिष्मा प्रभावी

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न. ते सत्यात उतरले. पण एका मतदारसंघात नव्हे, तर दोन. कोल्हापूर आणि हातकणंगले असे शंभर नंबरी निर्भेळ यश शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्य़ात मिळले. आणि याचमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील काँग्रेसची आजवरची लोकसभेच्या गडावरची सद्दी गुरुवारी संपुष्टात आली. या यशामुळे काँग्रेसचा झेंडा फडकण्याचा थांबला असला तरी शिवसेनेच्या चमकदार यशाला काँग्रेसचाच ‘हात’ लागला आहे, हे त्याचे एक खास वैशिष्टय़ .

आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी घेतलेल्या ‘आमचं ठरलंय’ या घोषवाक्याने निवडणुकीच्या रणनीतीला वेगळे वळण लागले. संजय मंडलिक यांच्या बाजूने वारे वाहण्यास यामुळे मदत झाली, तर ज्या विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उद्देशून आणि लक्ष्य ठेवून ही मोहीम राबवली त्यांना याचा जबर फटका बसल्याचे निकालाचे आकडे सांगत आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्याशी पुन्हा सामना करण्यास सेनेचे संजय मंडलिक उभे ठाकले. तुल्यबळ उमेदवाराची ही लढत कोण जिंकणार याचा अंदाज बांधणे कठीण होते. अगदी सुरुवातीपासून सट्टाबाजारातही दोन्ही उमेदवारांवरून चढ-उतार होत राहिले. अशावेळी मंडलिक याना एक मोठा आधार मिळाला. तो महायुतीतून नव्हे तर तर चक्क काँग्रेस मधून.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात टोकाचे शत्रुत्व होते. विधानसभा निवडणुकीत पाटील यांना पराभूत व्हावे लागले त्याला कारण धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांनी त्यांच्यावर मात केली होती.

या पराभवाला धनंजय महाडिक कारणीभूत असल्याचा राग पाटील यांना होता. पुढे विधान परिषदेत खासदारांचे चुलते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभूत करून पाटील यांनी उट्टे काढले. पाटील – महाडिक यांच्यातील दोन दशकाचा वाद वाढतच होता.

‘आमचं ठरलंय’ विरुद्ध ‘ध्यानात ठेवलंय’

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महाडिक यांना उमेदवारी मिळाल्यावर सतेज पाटील यांनी वैर विसरून मदत केली होती. यावेळच्या निवडणुकीतही असे होणार का, हा कळीचा मुद्दा बनला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अनेकदा माध्यमांनी छेडले होते. त्यावरून पवार यांनी वडगाव येथे ‘आमचं ठरलंय’ या घोषवाक्याला उत्तर देताना ‘मीही ध्यान्यात ठेवलंय’ असे प्रत्युत्तर दिले होते.

त्यातून सतेज पाटील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, पण पाटील काही बधले नाहीत. उलट, पाटील यांची अवघी कुमक संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरली होती. नगरसेवक, कार्यकर्त्यांंनी प्रचाराचा बाण दाखवून दिला होता. तो मंडलिक यांना पूरक ठरणारा आणि महाडिक यांच्या विरोधात जाणारा  होता.

ठरलं तसंच झालं!

माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे मंडलिक यांनी म्हटले आहे. तर चंद्रकांत पाटील यांनीही ‘ आमचं ठरलंय’ या भूमिकेची दाखल घेतली पाहिजे, ती भूमिका महत्त्वाची ठरली. त्याशिवाय महायुतीची अभेद्य ताकद मंडलिक यांच्या यशाला कारणीभूत ठरली, असे नमूद केले. तर, सतेज पाटील यांनी ‘आपलं जसं ठरलं, तसेच सगळ्यांनी केले. याबद्दल आभारी आहे. पुढील काळातही सहकार्य राहू द्या’ अशी समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवली आहे .