शिवाजी पुलावरील मिनी बस अपघातानंतर शासनाकडून मदत, शासनावर टीका आणि विरोधकांकडून सहकार्य असे तीन प्रकारचे प्रवाह दिसून आले. अपघात घडलेला शिवाजी पूल वादाचा विषय बनला आहे. मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम रखडल्यानेच जुन्या अरुंद पुलावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या अपघातातील निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची टीका शिवसेनेने केली आहे. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मदतकार्यासाठी लक्षणीय सहकार्य केले.

शिवाजी पुलाबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या ५ वर्षांपासून शिवाजी पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित असून, नवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. या पुलाचे काम २० टक्के अपूर्ण असले तरी बराच काळ हा पूल अपूर्ण असल्याने त्याची मजबुती तपासावी लागेल. नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरूठेवावा अथवा बंद करावा या बाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांना एकत्रित निर्णय घ्यावा लागेल.

शिवाजी पुलाला परवानगी देण्यात हयगय होत असल्याने शिवसेनेने शासनावर टीकास्त्र सोडले आहे. पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम रखडल्यानेच जुन्या अरुंद पुलावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या अपघातातील निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असा आरोप करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विकासकामांवर बंधन आणून निष्पाप नागरिकांचे जीव घेणारे कायदे कोणाच्या कामाचे, असा सवाल उपस्थित केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. विकासकामास आडकाठी घालणाऱ्या अशा कायद्यामुळे निष्पाप नागरिकांना मृत्युमुखी पडावे लागत आहे.

सतेज पाटील यांची मदत

अपघातातील मृतांना व जखमींना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी  मदतीचा हात दिला. मृतांना गावी पोहोचवण्यासाठी ११ रुग्णवाहिकांची सोय केली. पुणे येथून आलेल्या लोकांना परत पोहोचवण्यासाठी दोन मोटारींची सोय करण्यात आली. बाहेरगावावरून आलेल्या लोकांसाठी व मृतांच्या नातेवाइकांसाठी जेवणाची सोय केली. अपघातस्थळी पोहोचून सतेज पाटील यांनी सहकार्य केले.