16 October 2019

News Flash

कृषी महोत्सवात निवडणुकांच्या राजकारणाची पेरणी

कृषी प्रदर्शनाच्या नावावर राजकीय मतपेढी बांधण्याची एक संधी राजकीय नेत्यांकडे चालून आली आहे.

सतेज पाटील यांच्या भूमिकेने उभय काँग्रेसच्या ऐक्याला बाधा

दयानंद लिपारे, कोल्हापूर

बदलत्या शेतीला अनुसरून अद्ययावत तंत्रज्ञानाचा आविष्कार बळिराजासमोर जावा या उद्देशाने कोल्हापुरात सतेज कृषी प्रदर्शनाचे शिवार फुलवले गेले. संयोजक आमदार सतेज पाटील यांनी लोकसभेसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याची भूमिका अधोरेखित केल्याने उभय काँग्रेसच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह लागले. याचवेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि त्यांचे राजकीय स्पर्धक शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याबाबतीत पाटील यांची कोणाची बाजू घ्यायची यावरून कोंडी झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पाठ वळताच त्यांच्यावर करण्यात आलेली टीकाही चर्चेला कारण ठरली. यामुळे मात्र चार दिवसाच्या या खळ्यात राजकीय मळाच बहरला.

कृषी प्रदर्शनाच्या नावावर राजकीय मतपेढी बांधण्याची एक संधी राजकीय नेत्यांकडे चालून आली आहे. त्याचा आपल्यापरीने फायदा करून घेण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातो हे कोल्हापुरातील सतेज कृषी प्रदर्शनातून दिसून आले. आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करणारम्य़ा अत्याधुनिक कृषी अवजारांवर या प्रदर्शनात भर होता खरा,पण त्याचे महत्त्व विशद करण्याला प्राधान्य देण्याऐवजी राजकीय पेरणी करण्याला संयोजक आमदार पाटील यांच्यापासून ते सर्वपक्षीयांचा भर राहिला. शेती विषयी कमी आणि बदलत्या राजकीय समीकरणाला धरून राजकीय शेरेबाजी आणि टीकाटिप्पणीला जोर आला. आगामी लोकसभा—विधानसभा निवडणुकीची बेरीज—वजाबाकीची गणिते त्यांच्या विधानातून स्पष्ट होत गेली.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभेच्या आखाडय़ात पक्षाने उतरवण्याचा निर्णय घेतला असला तरी सतेज पाटील यांनी विरोधाची भूमिका  घेतली आहे.

अशातच, डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश ज्या पद्धतीने घडवून आणला त्यामुळे पाटील दुखावले गेले. त्यांच्या प्रवेशावर पाटील यांनी काहीच भाष्य केले नाही पण आपला रोख दाखवून दिला. निमंत्रण पत्रिकेत खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबरीने कोणत्याही पदावर नसलेल्या संजय मंडलिक यांना  स्थान देऊ न त्यांनी अप्रत्यक्षपणे महाडिक विरोधाचे दर्शन घडवले. मंडलिक  यांनीही त्यांच्याकडे टाळीसाठी जाहीरपणे हात पुढे केला तेव्हा पाटील यांच्या चेहरम्य़ावरील हास्य प्रतिसादाची भाषा बोलून गेले. उभय काँग्रेसने हातात हात घालून निवडणूक लढविण्याचे ठरवले असताना पाटील यांची भूमिका त्याला छेद देणारी ठरत आहे.

शेट्टींची बदलती भूमिका

खासदार राजू शेट्टी यांनी दोन टप्प्यात एफआरपी घेण्याचा प्रस्ताव साखर कारखानदारांसमोर धुडकावून लावताना एकही पैसा कमी घेणार नाही असे सुनावले. याचवेळी त्यांनी ऊ स उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाची तिजोरी रिकामी करू असे विधान करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धारेवर धरत, साखर कारखानदारांपेक्षा शासनाला लक्ष्य करणारी बदलती भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून आले.

पी. एन. पाटील —नरके वादात कोंडी

काँग्रेसचे ऐक्य असल्याचे सांगायचे आणि पडद्यामागून विरोध करण्याच्या काँग्रेसी प्रवृत्तीवर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी जाहीरपणे प्रश्न उपस्थित करून करवीर विधानसभेच्या करामतीवर बोट ठेवून सर्वच नेत्यांना टोला लगावला. मात्र , नंतर आमदार नरके यांनी सतेज पाटील यांना उद्देशून, बाकी काही नको, आशीर्वाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे आता संयोजक पाटील यांची आजी — माजी आमदारांत कोणाची बाजू घ्यायची यावरून भर मंचावरच कोंडी झाली.

First Published on January 4, 2019 2:11 am

Web Title: congress mla satej patil to support shiv sena candidate sanjay mandalik for lok sabha poll