News Flash

कर्नाटक निकालावर कोल्हापूर जिल्ह्यात सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सावध पवित्र्यात

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी निकालातील टक्केवारीकडे बोट दाखवत काँग्रेसचा तांत्रिक पराभव आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर  : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेले कोल्हापूर जिल्ह्यतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षाचे नेते निकालावर भाष्य करताना सावध पवित्र्यात दिसले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हा काँग्रेसचा नैतिक विजय असल्याचे सांगितले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस व निजद यांची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकच्या जनतेने धर्मनिरपेक्ष पक्षाकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय दिला असून, तो लोकसभा निवडणुकीसाठीचा संदेश असल्याचे नमूद केले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करताना महाराष्ट्रात त्यांना शिवसेनेची गरज लागेल, असा चिमटा काढला.

कोल्हापूर जिल्ह्यला लागूनच कर्नाटक राज्य आहे. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषा बोलली जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यतील अनेक नेत्यांना प्रचारसभेसाठी पाचारण केले होते. प्रचाराला हजेरी लावलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन. जनतेने दिलेला कौल आहे त्याला नाकारता येत नाही,असा उल्लेख करून शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेची गरज लागणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबाबत कोणती भूमिका घेतील हे स्पष्ट होईलच, पण शिवसेनेची ताकद नक्कीच भाजपपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी निकालातील टक्केवारीकडे बोट दाखवत काँग्रेसचा तांत्रिक पराभव आहे.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा काँग्रेसचा विजय मानला पाहिजे. पराभवाचे आत्मपरीक्षण करताच महाराष्ट्रात अशा प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असेही ते म्हणाले.  माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसने कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली असतानाही अपेक्षित यश  मिळाले नसल्याची कबुली दिली. बदलती सत्तासमीकरणे पाहता काँग्रेस व निजद यांची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस व निजद यांची मतांची बेरीज ५६ टक्के असल्याने कर्नाटकात काँग्रेसचे संयुक्त शासन येईल, असे सांगितले. या निकालाने निजद, राष्ट्रवादी अशा प्रादेशिक पक्षांना दिवस चांगले येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकाचा कौल हा धर्मनिरपेक्ष सत्ता यावी असा असल्याने जनमताची बूज राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर कर्नाटकातील निकाल धक्कादायक असल्याची कबुली राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ३८ टक्के लोकांनी काँग्रेसला मतदान करूनही तो  दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष बनला. तथापी काँग्रेसचाच मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये असेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:01 am

Web Title: congress ncp and shiv sena leaders campaigning for karnataka assembly elections now on silent mode
Next Stories
1 विनोद तावडे यांच्या चर्चेचे आव्हान डाव्यांनी स्वीकारले
2 कर्नाटकच्या मतदानाची कोल्हापुरात धांदल
3 मोठे करणाऱ्यांवरच राणे घसरतात- दीपक केसरकर
Just Now!
X