कार्यकर्त्यांना संधी नदिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचा एकेक बुरुज ढासळून भाजप जिल्ह्यात मजबूत होत आहे. काँग्रेसमुक्त होत असलेला जिल्हा भाजपयुक्त होत आहे. हातकणंगले तालुका राष्ट्रवादीमुक्त बनला आहे, असे मत  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले येथे व्यक्त केले. हातकणंगले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हा परिषदेत चार वेळा सदस्य राहिलेले अरुण इंगवले यांनी समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.  इंगवले यांच्या रूपाने सामान्य माणसासाठी जगणारा व विकासकामात अग्रेसर असणारा कार्यकर्ता भाजपला मिळाला असल्याने  कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर मोठय़ा सत्काराच्या तयारीला लागावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. भाजपचे  जिल्हाध्यक्ष िहदुराव शेळके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पाटील म्हणाले, जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांपकी सात नगरपालिकात सत्ता हस्तगत केली आहे. आम्हाला जातीयवादी म्हणून हिणवणाऱ्या हसन मुश्रीफ यांना कागलमध्ये सत्ता आणण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक चालतात; मग आम्ही जातीयवादी कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आ. सतेज पाटील व मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्हा टोलमुक्त करता आला नाही; पण भाजप सरकारने ४६९ कोटी रुपये ठेकेदाराला देऊन टोलमुक्त केले आहे. सरकारने लोकांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणल्या असल्याने सर्व ठिकाणी भाजपची सत्ता येईल.

आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, इंगवले यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्यातील राजकीय दिशा बदलण्यास प्रारंभ झाला असून त्यांच्या गटाला कोणताही दगा फटका बसणार नाही. हातकणंगलेचे विद्यमान आमदार ‘गाणी’ आणि ‘शाहिरी’ म्हणण्याचे काम करत असल्याने मतदारसंघातील विकास खुंटला आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर यांच्यावरही टीका केली.

इंगवले म्हणाले, भाजप पक्षात प्रवेश कार्यकर्त्यांची मते आजमावूनच  घेतला आहे. पक्षातील प्रवेश हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा यू टर्न असून जिल्ह्यातील भाजप मजबूत करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहीन. यावेळी आ. अमल महाडिक, अतुल जोशी, जि. प. सदस्य देवानंद कांबळे यांची भाषणे झाली.