कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील लक्ष्य

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

कोल्हापूर जिल्ह्य़ात लोकसभा, विधानसभा व त्याआधी महापालिका निवडणुकीत एकत्र आलेली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आता जिल्हा परिषदेतही एकत्र येण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिकस्त देण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्याची तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादांनीही महाडिक, कोरे आणि आवाडे यांच्या माध्यमातून पुन्हा कमळ फुलविण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात राजकारणाला दिवसेंदिवस रंग चढताना दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. ६७ पैकी प्रत्येकी १४ जागा कॉँग्रेस आणि भाजपने मिळविल्या. अशा स्थितीत शिवसेना, राजू शेट्टी, विनय कोरे, प्रकाश आवाडे आदींना सोबत घेऊन सत्ता स्थापण्यात तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यशस्वी ठरले होते. मात्र, अडीच वर्षांचा कालावधी भाजपसाठी फारसा समाधानकारक नव्हता. मित्रपक्षांच्या कुरबुरी, अंतर्गत वाद, निधीची उपलब्धता आणि वाटप अशा अनेक  कारणांनी कारभार वादग्रस्त ठरला. अडीच वर्षांनंतर अध्यक्षपद मागास वर्गासाठी राखीव झाले आहे. नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी २ जानेवारीला सभा आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्य़ातील राजकारण पुरते बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत काँॅग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक  यांना पाठिंबा दिला. मंडलिक यांनी या दोघांना विधानसभेला संपूर्ण मदत केली. आता तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँॅग्रेस यांची अधिकृत युती झाल्याने या तिघांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ताबदल करण्याचा निर्धार केला आहे.

दुसरीकडे, सतेज पाटील यांनी कॉँग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे १०, स्वाभिमानीचे २ व अन्य ३ अशा ४० सदस्यांचा पाठिंबा असल्याने सर्वाधिक  सदस्य असलेल्या काँग्रेसचाच पुन्हा अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे.

भाजपची रणनीती

विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बंद खोलीत रणनीती आखली आहे. भाजपत प्रवेश केलेले माजी खासदार धनंजय महाडिक , महादेवराव महाडिक  या काका-पुतण्याकडे सत्ता राखण्यासाठी पुरेसे संख्याबळ जमवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय शिवसेनेचे सगळेच सदस्य महाविकास आघाडीत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन सत्ता टिकवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

स्थानिक नेत्यांना आमिष..

गोकुळ दुध संघाच्या सत्तेत भागीदारी देण्याचे आमिष दाखवून आणि स्थानिक  नेत्यांतील मतभेदांना उकळी देऊन फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. काहीही करून सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप-महाविकास आघाडी यांच्यातील शह-काटशाहाच्या राजकारणात संख्याबळामध्ये बाजी कोण मारणार, यावर जिल्हा परिषदेचे सत्ताकारण अवलंबून आहे.