26 February 2021

News Flash

पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसला तारणार?

जनआक्रोश यात्रेची कोल्हापूरमधून सुरुवात

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| दयानंद लिपारे

जनआक्रोश यात्रेची कोल्हापूरमधून सुरुवात

राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी जनआक्रोश यात्रेचा प्रारंभ कोल्हापूरपासून होत असला तरी पक्षांतर्गत ‘आक्रोशा’चा वेध घेऊन विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मार्गक्रमण करावी लागणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्य़ांत सहकारसम्राटांच्या सुपीक भूमीत काँग्रेसचा पाया भक्कम होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला या भागात धक्का बसला. भाजपची सत्ता आल्याने काही काँग्रेसजनांनी उगवत्या सूर्याला नमन करीत हाती कमळ धरले. विद्यमान सरकारची कामगिरी असमाधानकारक असल्याची टीका काँग्रेसमधून व्यक्त होत असते. मात्र, ती प्रखररीत्या जाहीरपणे मांडण्यास काँग्रेसचे नेते कचरताना दिसतात. पक्षाचा आदेश आला म्हणून सोपवलेले आंदोलन  उरकायचे अशी स्थिती अनेक जिल्ह्य़ांत आहे.

विरोधक म्हणून हवी असणारी आक्रमकता काँग्रेसमध्ये दिसत नाही. केवळ सत्तेच्या खुच्र्या उबवायची सवय लागल्याचा हा परिणाम नेते निष्क्रिय राहिल्याने कार्यकर्त्यांमध्येही लढायची खुमखुमी दिसत नाही. ते ही कोणत्या त्यांच्या प्रश्नावर हिरिरीने लढताना नाहीत. आता जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने नेते आणि कार्यकर्तेही सक्रिय होत असल्याने चेतना जाणवत आहे.

सक्षम उमेदवारांचा अभाव

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मदार पश्चिम महाराष्ट्रावर आहे. या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही काँग्रेसचे बळ एकवटले की सरशी आपलीच असा होरा बांधलेले उभय काँग्रेसचे नेते हुरळून गेले आहेत. पण, निवडणुकीला सामोरे जाण्याआधी पक्षाकडे खरेच किती सक्षम उमेदवार आहेत याची अचूक पारख पक्षाकडून झालेली नाही. काही मतदारसंघ तर सक्षम उमेदवाराअभावी मित्रपक्षाकडे सोपवावे लागतील अशी अवस्था आहे.

शाहूवाडीत उदयसिंगराव गायकवाड यांचे घराणे अस्तित्वाच्या शोधात आहे, राधानगरीत माजी आमदार बजरंग देसाई फारसे सक्रिय नाहीत, तर त्यांचे सुपुत्र भाजपत आहेत. मिरज राखीवमध्ये भाजपशी सामना करण्यास पक्षाकडे योग्य उमेदवार नाही. सांगोल्यात शहाजी पाटील शिवसेनेत गेल्याने उमेदवाराची वानवा आहे. सोलापूर उत्तरमध्ये बाबुराव चाकोते यांच्यानंतर सक्षमपणे बांधणी केली नसल्याने काँग्रेसला लाखाच्या फरकाने पराभूत व्हावे लागते. अशा मतदारसंघात काँग्रेसला निवडून येण्यायोग्य, किमानपक्षी पक्षाची इभ्रत राखेल असा उमेदवार शोधणे आणि त्याला सर्वागाने बळ देणे गरजेचे असणार आहे.

गटबाजी आणि ऐक्याचा दिलासा

काँग्रेस आणि गटबाजी हे जणू दोन्ही एकमेकांत तादात्म्य पावले आहेत. एकमेकांच्या पायात पाय अडकवून पक्षांतर्गत विरोधकाचा काटा काढणे हे जणू आपले परम कर्तव्य असल्याची धारणा काँग्रेसच्या नेत्यामध्ये मनीमानसी रुजली आहे. याचाच परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ३६ विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर शून्य, सांगलीत एकटे विश्वजित कदम (आधी पतंगराव कदम), सोलापुरात प्रणिती शिंदे, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे इतके  मोजकेच हाताचा प्रभाव दाखवून विधानसभेत पोहचू शकले. इतरांच्या पराभवाला मोदी लाट आणि पक्षांतर्गत कुरघोडी कारणीभूत ठरल्या. त्यासाठी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षाशी जोडून घेण्यावर भर दिला जात आहे. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी, तर कोल्हापुरात सामूहिक प्रयत्नातून ‘घरवापसी’चा प्रयत्न चालवला आहे. कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासह जयवंतराव आवळे, कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, सतेज पाटील या माजी मंत्र्यांनी हातात हात घालून चालण्याचा ऐक्याचा प्रयोग सुरू केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांच्याशी संवाद सुरू ठेवला आहे. ‘गटबाजी केल्याचा परिणाम काय होतो हे काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसजनांनी जाणले आहे. पूर्वी केलेल्या चुका टाळायचे ठरवले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनही याबाबत सर्व ठिकाणी सूचना दिल्या आहेत. पक्षनेते राहुल गांधी यांनी सक्षम असणाऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे, त्यांना पक्षाकडून बळ दिले जाणार आहे.

पक्षांतर्गत समन्वय ठेवण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या स्तरावरून नजर ठेवली जात आहे. याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाची स्थिती बदलत चालली आहे.     – सतेज पाटील, काँग्रेस नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:19 am

Web Title: congress party in western maharashtra
Next Stories
1 पश्चिम महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे संकट
2 शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार, नगरसेवकांचा हलगर्जीपणा जबाबदार
3 १० हजारांहून अधिक सदस्यांचे पद धोक्यात!
Just Now!
X