|| दयानंद लिपारे

यात्रा मार्गासाठी केवळ पक्षाला पूरक मतदारसंघाचीच निवड

प्रदेश काँग्रेसच्या आजपासून सुरू होत असलेल्या यात्रेचे नाव जरी ‘जनसंघर्ष’ असले तरी या यात्रेच्या मार्गावर एक नजर टाकली तर हे काँग्रेसचे प्रचार अभियान असल्याचे उघड होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा लक्ष्यवेध करणे हा हेतू ठेवून निघणारी ही यात्रा केवळ पक्षाला आशेचे किरण असणाऱ्या मतदारसंघातून फिरणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आतापासूनच निवडणूक तयारीला हात घालणारी मोहीम उघडली आहे.  महाराष्ट्रात याची सुरुवात जनसंघर्ष यात्रेने होत आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. मात्र प्रत्यक्षात या यात्रेची आखणी पाहता त्यातून सत्ताधाऱ्यांविरुद्धच्या आक्रमकतेपेक्षा स्वपक्षाच्या प्रचाराचा अंतस्थ हेतू दिसतो आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला जे  मतदारसंघ सुरक्षित वाटतात किंवा आजच्या ढासळत्या स्थितीतही जिथे आशेचे किरण आहेत, अशाच मतदारसंघाची निवड या यात्रेसाठी करण्यात आली आहे. याची प्रचिती  कोल्हापूरपासूनच होते. कोल्हापूर शहराचा मोठा भाग हा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या करवीर विधानसभा संघात येतो.  यानंतर या यात्रेत सायंकाळी होणारी सभा कळंबा गावात येथे असून हे गाव आमदार सतेज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात आहे. आमदार पाटील यांनी तर काँग्रेस यानिमित्ताने प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे उघडपणे म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या हातकणंगले, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या इचलकरंजी आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या शिरोळ या  गावांमध्ये सभा होणार आहे.

हेच चित्र सांगलीतही पाहायला मिळते. सांगली  शहर हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहे. या जिल्ह्यत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या विटा, आमदार विश्वजित कदम यांच्या पलूस—कडेगाव या मतदारसंघात सभांचा फड  रंगणार आहे. तिसऱ्या दिवशीची सुरुवातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड मतदारसंघातून होणार आहे. माण या आमदार जयकुमार गोरे यांच्या  मतदारसंघात पुढची सभा होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यतही असाच क्रम मिळत पाहायला मिळत आहे. आमदार  भारत भालके यांच्या पंढरपूर मतदारसंघात पहिली सभा आहे.  सोलापूर शहरात यात्रा तीन ठिकाणी जाणार असून त्यातील दोन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. एका मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करतात. शेवटची सभा अक्कलकोट या आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मतदारसंघात आहे.  पाच सप्टेंबर रोजीची सुरुवात  काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघातून होणार असून यात्रा पुढे पुणे जिल्हयात प्रवेश करणार आहे.

सुरक्षित मतदारसंघाची निवड

यात्रेचा हा क्रम पाहिला तर काँग्रेसला सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघाची निवड  प्रामुख्याने केली आहे. अडचणीचे वा जनाधार कमी असणाऱ्या भागाला यात्रा मार्गावरून वगळण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यतील उत्तरेकडील पन्हाळा, शाहूवाडी असो किंवा दक्षिणेकडील चंदगड,कागल, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा,  राधानगरी हे तालुके असोत, यापैकी एकाही ठिकाणी ही यात्रा फिरकणार नाही. यात्रेचे स्वरूपच काँग्रेसने बचावात्मक ठेवले आहे. खरे तर काँग्रेसच्या वाटय़ाला येणाऱ्या मतदारसंघाशिवाय अन्य मतदारसंघात काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडून वातावरण पक्षाला पूरक करण्याच्या दृष्टीने पावले पडणे गरजेचे होते. पण पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी हे बचावात्मक धोरण स्वीकारण्यात आल्याचे दिसते आहे. भाजप,  शिवसेना या विरोधकांच्या ताब्यात असलेल्यांच्या मतदारसंघात तर दूरच पण मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघात देखील ही यात्रा कुठेही फिरणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाचे अस्तित्व राज्यभर ठळक करण्याची नामी संधी असताना बचावात्मक पवित्रा काँग्रेसने घेतल्याचे बोलले जात आहे.