21 October 2018

News Flash

काँग्रेसचीही आता रथयात्रा

प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनात देवदर्शनही

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनात देवदर्शनही

धर्मनिरपेक्षतेचा जागर करणारा काँग्रेस पक्षही आता भाजपच्या वाटेने जाऊ लागला आहे. आजवर भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेचा भाग असलेले देवदर्शन, रथयात्रांसारखे कार्यक्रम काँग्रेसच्या आगामी राज्यव्पापी आंदोलनात ठळकपणे दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य शासनाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेचे नावच मुळी ‘जनजागृती रथयात्रा’ असे भाजपच्या जातकुळीला शोभेसे ठेवण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने आजवर अनेक नावांनी आंदोलने केली, मात्र यासाठी ‘रथयात्रा’ हे नाव त्यांनी कधीच धारण केले नव्हते. रथयात्रा हे खरेतर आजवरचे भाजपचे ‘अस्त्र’. लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेमुळेच भाजप सत्तेच्या जवळ पहिल्यांदा गेला होता. तेथून पुढे भाजपने अनेकदा रथयात्रा काढत मतपेढीचे राजकारण केले. हिंदूंच्या मतांना हाक घालणारा हाच ‘रथयात्रा’ शब्द आता काँग्रेसनेही घेतला आहे. ‘जनजागृती रथयात्रा’ नावाने कोल्हापुरातून सुरू होणारी ही यात्रा भाजप सरकारच्या कारभाराविरोधात प्रचार करत राज्यभर फिरणार आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या धोरणांमधील हा बदलता कल हा एवढय़ा ‘रथयात्रे’वरच न थांबता तो देवदेवतांच्या दर्शनातही दिसून येत आहे. रथयात्रेचे नियोजन करताना प्रत्येक जिल्हय़ातील महत्त्वाच्या हिंदू देवतांचे दर्शन हे काँग्रेसच्या या यात्रेतील मुख्य भाग ठेवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा समिती त्यानुसार नियोजन करत आहे. या यात्रेचा प्रारंभ करवीरनगरी निवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनाने होणार असून पुढे ती नृसिंहवाडी, सांगलीतील गणेश दर्शन, अक्कलकोट, पंढरपूर असे राज्यभरातील देवतांचे दर्शन घेत पुण्यात थंडावणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक मंदिरांचे उंबरठे झिजवत देवदेवतांचे दर्शन सुरू केले होते. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या या नव्या पवित्र्याबद्दल त्या वेळीही मोठी चर्चा झाली होती. याच धोरणाचा धागा पकडत महाराष्ट्रातील पक्षाची ही रथयात्रादेखील विविध देवतांचे दर्शन घेत राज्यभर फिरणार आहे.

मंदिरभेटींचा काँग्रेसला फायदा

गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी मंदिरांना दिलेल्या भेटींचा राजकीय लाभ काँग्रेस पक्षाला झाला. राहुल गांधी यांनी भेट दिलेल्या मंदिर परिसरातील ४७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. महात्मा गांधी म्हणत त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी मी हिंदुत्ववादी नाही पण हिंदू आहे, अशी मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधील हा बदल हिंदूना जवळ करण्यातलाच आहे.  – डॉ. प्रकाश पवार, राज्यशास्त्राचे अभ्यासक

First Published on December 30, 2017 1:04 am

Web Title: congress party movement against bjp 2