News Flash

राफेल खरेदी गैरव्यवहारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसची निदर्शने

राफेल विमान खरेदीच्या विषयावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याची नीती आखली आहे.

राफेल विमान खरेदीच्या काँग्रेसने कोल्हापुरात निदर्शने केली. त्यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पी. एन. पाटील, सतेज पाटील, प्रल्हाद चव्हाण आदींचा सहभाग होता.      (छाया- राज मकानदार)

कोल्हापूर : राफेल विमान खरेदीत केंद्र सरकारने केलेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले.

राफेल विमान खरेदीच्या विषयावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याची नीती आखली आहे. त्यासाठी जिल्हाव्यापी आंदोलने केली जात आहेत. त्याअंतर्गत आज कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदींनी केले.

राष्ट्रीय सुरक्षा व कायद्याचे उल्लंघन करीत ३६ राफेल लढावू विमान खरेदी करत केंद्र सरकारने सरकारी तिजोरीची लूट केली आहे. या व्यवहारात मोदी सरकार व संरक्षण मंत्रालयाने देशवासीयांची फसवणूक केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

राफेल विमान खरेदीत झालेल्या ४१ हजार कोटी रुपयांच्या घोटाळय़ाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निदर्शनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मी देशाचा रखवालदार आहे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोटय़वधीचा घोटाळा करून उद्योजकांसोबतचे भागीदार झाले असल्याचा टोला देखील त्यांनी या वेळी लगावला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात भारतीय वायुदलासाठी फ्रान्सकडून विमान खरेदीची प्रक्रिया २००८  मध्ये सुरू झाली होती. त्या वेळी एका विमानाची किंमत ५२६ कोटी रुपये होती. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एका विमानाची किंमत १६७० कोटी रुपये इतकी वाढ झाली. ही वाढ कशी झाली असा सवालही त्यांनी केला. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला राफेल लढाऊ  विमान दुरुस्तीचे ३० हजार कोटीचे कंत्राट दिले गेले. त्यामुळे हे काम अंबानी यांच्या कंपनीला का दिले गेले, या कंपनीस यापूर्वी लढाऊ  विमानांचा कोणताही अनुभव नसल्याचेही ते म्हणाले.

 

सांगलीतही निदर्शने

प्रतिनिधी, सांगली – राफेल विमान खरेदीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा शनिवारी काँग्रेसने सांगलीत निदर्शने करीत निषेध नोंदविला. पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या मोदी सरकारने राफेल खरेदीमध्ये अनियमितता करून हजारो कोटींचा चुराडा करण्यात आला असल्याचा आरोप करीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला डावलून खासगी कंपनीकडून खरेदीचा करार करण्यात कोणा कोणाचे हित गुंतले आहेत, असा सवाल या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. शनिवारी दुपारी सांगलीतील स्टेशन चौकामध्ये काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, काँग्रेसचे नगरसेवक कार्यकत्रे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:46 am

Web Title: congress protest in kolhapur against scam in the rafale deal
Next Stories
1 कौटुंबिक वादातून जावयाचा पत्नीसह सासू-सासऱ्यांवर हल्ला, सासऱ्याचा मृत्यू
2 ‘गोकुळ’च्या वादातून लोकसभा, विधानसभा निवडणुकीला फोडणी
3 मराठा समाजाच्या राजकीय पक्षावरून वादाचे फटाके
Just Now!
X