मूठभर वर्गाच्या हिताला प्राधान्य देत भाजपा सरकार नियोजनशून्य कारभार करीत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा आव आणून तीच मदत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून परत घेण्याचा कुटील डाव आखत आहे. शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी ही दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
गारपीट, दुष्काळ आदी नसíगक आपत्ती निवारणासाठी झालेला खर्च आणि डिझेल-पेट्रोलच्या कमी झालेल्या किमतीमुळे राज्य शासनाच्या  महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
‘अच्छे दिन कहाँ गए, परदेस गए, परदेस गए’, ‘चले जाव चले जाव मोदी, फडणवीस सरकार चले जाव’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. या वेळी शिरस्तेदार अनिल साळुंखे व निवासी नायब तहसीलदार श्रीकांत जोशी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. नगरसेवक शशांक बावचकर, शामराव कुलकर्णी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. या आंदोलनात अशोक आरगे, अशोक सौंदत्तीकर, धोंडीलाल शिरगांवे, अहमद मुजावर, संजय कांबळे व कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.