दक्षिणेकडील राज्यांमधील कठोर टाळेबंदीचा परिणाम

कोल्हापूर : करोना संसर्ग वाढत असल्याने काही राज्यांमध्ये कठोरटाळेबंदी करण्याचे परिणाम वस्त्रोद्योगावर दिसू लागले आहेत. दक्षिणेकडील राज्यांत कठोर टाळेबंदीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सूत दरवाढ होत आहे. काही प्रमाणात कापडदरांमध्ये वाढ होत असली तरी सूतदरामध्येही वाढ होत असल्याने त्याचा फायदा होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. याचवेळी काही आशादायक अहवाल प्राप्त झाल्याने संमिश्र परिस्थितीतून वस्त्रोद्योगाची वाटचाल होत आहे.

देशात करोना साथीच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. करोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये टाळेबंदी लागू केली आहे. वस्त्रोद्योग अधिक प्रमाणात असलेल्या महाराष्ट्रासह दक्षिणेतील तमिळनाडू, कर्नाटक तसेच गुजरात या राज्यात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कापड उत्पादनातील कच्चा माल सूत आहे. दक्षिणेकडील राज्यांत सुताची जास्तीत जास्त निर्मिती होत असते. तमिळनाडूत कडक टाळेबंदीची नियमावली लागू केली आहे. अन्य उद्योग, वस्त्रोद्योग बंद असल्याने सुताचा पुरवठा विस्कळीत होत आहे.

सूत दरवाढीवर संताप

आधीच कापडनिर्मिती रडत-खडत होत असताना सूत पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. अशातच सुताच्या काही प्रकारामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्याभरात दहा टक्के वाढ झाल्याने यंत्रमागधारकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ‘गेल्या ८ ते १० महिन्यांपासून सुताच्या दरात अनैसर्गिकरीत्या वाढ होत आहे. सूत दरामध्ये ५० टक्के वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात त्या प्रमाणात कापडाचे दर वाढलेले नाहीत. कापडाला अजिबात मागणी नसताना सूत दरात अनैसर्गिकरीत्या दरवाढ होत आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात सूत निर्यात होत असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत सूत नसल्याचे कारण देऊ न दरवाढ केली जात असल्याने ती रोखावी अशी मागणी आहे, असे ‘दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन’चे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे कापडातील काही प्रकारात किंचित वाढ झाली असताना मागणीचे प्रमाण घटले आहे. लग्नसराई संपत आली असल्याने त्याचा फारसा लाभ झाला नसल्याचे उद्योजक, व्यापारी सांगतात.

उद्योजकांची दमछाक

कठोर टाळेबंदीच्या नियमावलीमध्ये सवलत मिळून उद्योग सुरू होईपर्यंत फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. सध्या सुरत बाजारपेठेमधील हालचाली वाढल्या आहेत. तेथील व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. राजस्थानातील पाली-बालोत्रा येथे कापड प्रक्रियागृहांना (प्रोसेसर्स) गती आली असल्याने तेथील हालचालीही वाढल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याातील कडक टाळेबंदी मागे घेतल्याने इचलकरंजीतील यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत राज्यात अन्यत्रही काही प्रमाणात सुधारणा होत आहे. पण अद्यापही कापडाच्या किरकोळ विक्रीची दुकाने सुरू झालेली नाहीत. टाळेबंदीचे नियम लागू असल्याने मॉलमधील विक्रीही ठप्प आहे. बाजारपेठ अजूनही पूर्णता गतिमान झालेली नाही. सूत- कापडदरातील चढ-उतार सतत सुरू असल्याने नफा-तोट्याचे गणित घालता वस्त्रोद्योजकांची दमछाक होत आहे.

आशादायक वातावरण

तथापि, काही सर्वेक्षण मधून आगामी काळात आशादायक वातावरण असल्याचे संकेत आहेत. भारतीय मानांकन आणि संशोधन संस्थेच्या पाहणीनुसार करोना काळात वस्त्रोद्योगावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी त्याची आगामी गती चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

परप्रांतीय कामगार घरी गेले असल्याने निर्मितीवर परिणाम होणार आहे. मात्र, निर्यात बाजारपेठेचा चांगला फायदा मिळू शकेल. निर्यातीच्या बाजारपेठेत मागणी चांगली असल्याने परकीय  चलन मिळण्याचे लाभ होऊ  शकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एकुणच काही बऱ्या तर काही वाईट अशा संमिश्र परिस्थितीतून वस्त्रोद्योग वाटचाल करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्याचे संकेत दिलासादायक आहेत.