इचलकरंजीतील सोडगे मळ्यातील दूषित पाणी प्रश्नावरुन बुधवारी संतप्त नागरिक व नगरपालिका पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. अपशब्दांच्या वापरामुळे नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या या गोंधळात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. गोंधळा दरम्यान नगराध्यक्षांच्या टेबलावरील काच फुटल्याने तणावाच्या वातावरणात भरच पडली. अखेरीस नगरसेवकांच्या मध्यस्थीने हा प्रश्न लवकरात लवकर संपुष्टात आणण्याच्या ग्वाहीनंतर आंदोलक शांत झाले.
गत काही दिवसापासून सोडगे मळा परिसरात असलेल्या फासेपारधी वसाहतीमध्ये नळाला मातीमिश्रित पाणी येत आहे. या संदर्भात भागातील नगरसेवकांकडे तक्रार करुनही काहीच कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अखिल भारतीय विमुक्त घुमंतु आदिवासी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नगराध्यक्षा बिरंजे यांना भेटण्यासाठी आले होते. या वेळी वस्तुस्थिती सांगत असतानाच भागातील नगरसेवक मदन झोरे उपस्थित होते. या वेळी चच्रेदरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी दूषित पाणी नगरसेवकांना पाजणार असल्याचे वक्तव्य केले. त्यावरुन झोरे व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यातच झोरे यांना एकेरी शब्द वापरत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. या वेळी तेथे उपस्थित असलेले दीपक पाटील हे काळे यांच्यावर अंगावर धावले. त्यामुळे चांगलाच गोंधळ माजला. या गोंधळातच नगराध्यक्षांच्या टेबलावरील काच फुटल्याने तणावात भरच पडली.
उपनगराध्यक्ष रणजित जाधव, रवि रजपुते, महादेव गौड, विठ्ठल चोपडे, सयाजी चव्हाण यांनी आंदोलकांना शांत करुन दालनाबाहेर आणले. त्यानंतर उपनगराध्यक्षांच्या दालनात चर्चा होऊन येत्या आठ दिवसात भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मिळाल्यानंतर आंदोलक माघारी परतले. ही सर्व घटना घडल्यानंतर पोलिस नगरपालिकेत दाखल झाले.