दूषित पाणी प्रश्नावरून महिला सदस्या आक्रमक

कोल्हापूर महापालिकेच्या सलग तीन सभांमध्ये दूषित पाणी प्रश्नावरून  महिला सदस्यांनी अत्यंत आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या असल्या, तरी पाणीपुरवठय़ाचे चित्र बदलताना दिसत नाही. अळीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने सुभाषनगर, सरनाईक वसाहत, यादव कॉलनी, जमादार कॉलनी आदी भागातील प्रभागातील नगरसेविकेसह  नागरिकांनी बुधवारी  रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी आलेले महापालिकेचे आरोग्य अधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांना  घेराव घालून दूषित पाण्यामुळे डेंग्यूची साथ मोठय़ा प्रमाणात उद्भवल्याचे सांगून संताप व्यक्त केला. त्यावर आरोग्य विभागाने पाणी साठवण गुणवत्ता शोधमोहीम सुरु केली, तर पाणी पुरवठा विभागाने दूषित पाणी कोठे मिसळते याचा शोध सुरु ठेवला.

कोल्हापूर शहरात  पाणी पुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे . त्यावरून महापालिका सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला सभेत धारेवर धरले . तरीही फारशी सुधारणा होत नसल्याने नगरसेवक, नागरिकांमध्ये नाराजी आहे. अशातच  सुभाषनगर , सरनाईक वसाहत , यादव कॉलनी  परिसरात आळीमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने  डेंग्यूची साथ मोठय़ा प्रमाणात उद्भवल्याने भीतीचे वातावरण आहे . त्यामुळे आज येथील नगरसेविका वहिदा सौदागर, मिजबा जमादार ,सलीम बेग,  साद  मुजावर   यांच्यासह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पाणी पुरवठामध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उभे राहिले.

याठिकाणी आरोग्य अधिकारी डॉ . विजय पाटील , जल अभियंता  सुरेश कुलकर्णी हे गेले असता नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पाटील यांनी आपण डॉक्टर असून डेंग्यूचे रोगी आढळले नसल्याचे सांगितले. त्यावरून नागरिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना परिसरातील एक रुग्णालयात नेऊन तेथे उपचार घेणारे रुग्ण दाखवले.

या प्रकरणाची दखल  घेऊन महापालिकेने उपाययोजना सुरु केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. आरोग्य अधिकारी डॉ. पाटील म्हणाले, की या भागात  पाणीसाठा करण्यासाठी जुने बॅरल मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. डेंग्यूचे डास संथ, ताज्या  पाण्यात कसे होतात याबाबतचे प्रबोधन तेथील नागरिकांना केले जात आहे.  महापालिकेने धूर, औषध  फवारणी मोहीम या भागात  सुरु केली आहे.

जल अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले, की गटारीचे सांडपाणी येथे कोठेतरी एकमेकांवरुन जात असल्याचा विचार करुन त्याचा शोध सुरु ठेवला आहे. त्यासाठी दुरुस्ती करावी लागणार आहे. याचा  खर्चाचा काही भाग नागरिकांना उचलावा लागणार असल्याने सहकार्य केले पाहिजे.