करोनाबाधित पत्नीपाठोपाठ पतीचेही निधन झाले. काम संपवून परत येतो असे सांगून गेलेले आई वडील कायमचे अंतरल्याने त्यांची दोन्ही बालके पोरकी झाली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील या दुर्दैवी घटनेने सगळ्यांचेच मन हेलावले आहे.

शित्तूर पैकी मलकापूर या गावातील हे मूळचे कुटुंब. उभयता उच्चशिक्षित. ते पुण्यातील मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. एक मुलगा व मुलगी यांच्या समवेत हे सुखी कुटुंब पुण्यात स्थायिक झाले होते. करोना संसर्ग वाढल्यावर कंपनी काही काळासाठी बंद झाली. त्यांनी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसानंतर पत्नीला प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे दोघांनीही करोना तपासणी केली असता ती सकारात्मक आली. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी थोड्या वेळातच काम आवरून परत येतो अशी समजूत घालून, ते उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले. दोन दिवसापूर्वी पत्नीचा मृत्यू झाला. निराशेच्या गर्तेत असलेल्या पतीचा काल रात्री मृत्यू झाला. माता-पित्याचे छत्र हरपल्याने सहा व आठ वर्षाची बालके पोरकी झाली आहेत. ते आई वडील घरी येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना आई-वडिलांची करुण कहाणी अद्याप समजलेली नाही. त्यांची समजूत कशी काढायची या विचाराने नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.