दयानंद लिपारे

करोना कालावधीत कोल्हापूर जिल्ह्य़ात खरेदी करण्यात आलेली औषधे, यंत्रसामग्री यांच्या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा जिल्ह्य़ातील बडय़ा राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने झाला असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

या साहित्याच्या खरेदी दरांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असून त्यावर लेखापरीक्षणात गंभीर ताशेरे मारण्यात आल्याने घोटाळ्यात तथ्य असल्याचे सकृद्दर्शनी दिसत आहे. या आरोपाने राजकीय, प्रशासकीय पातळीवर पडसाद उमटले आहेत. खरेदीचे केंद्रस्थान जिल्हा परिषद असल्याने जिल्हा प्रशासन आणि सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांबाबत संशयास्पद वातावरण झाले आहे. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खरेदी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी घोटाळ्याचा इन्कार केला आहे.

विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करोना साहित्य खरेदीत राज्यभरातच मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्य़ातील करोना खरेदीतील कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. हाच धागा पकडून अधिवेशन सुरू असताना जिल्हा भाजपने कोल्हापुरात करोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करून कॅगद्वारा चौकशी करण्याची मागणी केल्याने हे प्रकरण गाजत आहे. जिल्ह्य़ामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली आहे. संसर्ग वाढू लागल्यावर खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून औषधे व नियंत्रण साहित्याच्या खरेदीचा सपाटा लावण्यात आला.

जादा दर..

करोना नियंत्रण साहित्य खरेदी करण्याला भाजपसह इतर तक्रारदार यांचा आक्षेप नाही. मात्र शासकीय पोर्टलवर औषध कंपन्या, साहित्याची उपलब्धता याची सविस्तर माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून निवडक कंपन्यांकडून ही खरेदी अवाच्या सवा दराने केलेली आहे. थर्मल स्कॅनरची किंमत ११०० रुपये असताना ते १० हजार रुपयांना, १४ रुपयांची मुखपट्टी २०५ रुपयांना, ६० रुपये अर्धा लिटर र्निजतुकीकरण साहित्य २५० रुपये, ३५० रुपयांचे पीपीई किट १७०० रुपयांना अशा भरमसाट दराने खरेदी केली आहे. अनेक पात्र कंपन्यांना डावलून राजकीय हितसंबंध असणाऱ्या लोकांच्या अपात्र कंपन्यांकडून खरेदी केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या खरेदीवर लेखापरीक्षणात ताशेरे मारले असल्याने ८८ कोटींच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा भाजपसह अनेक तक्रारदारांच्या तक्रारीत संशयाचे धुके असल्याचे दिसून येत आहे. हा घोटाळा झाल्याचे सांगताना भाजपचे तिघेजणच उपस्थित होते. इतका मोठा घोटाळा झाला असताना याबद्दल भाजपचे पदाधिकारी आणि अन्य जिल्हा परिषद सदस्य का बोलत नाहीत; याही बाबी संशयास्पद ठरत आहेत. ज्यांनी तक्रारी केल्या ते हा मुद्दा अखेपर्यंत धसास लावणार का यावरही प्रश्नचिन्ह असल्याने आरोप करणाऱ्या भाजपचीही या प्रकरणात कसोटी लागणार आहे.

जिल्हा परिषदेचा संबंध नाही -मुश्रीफ

करोनाकाळातील खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन होती. त्यात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे सदस्य होते. त्यामुळे भ्रष्टाचार, गैरव्यवहाराच्या संशयाची सुई ही जिल्हा परिषदेकडे फिरते हे खरे आहे. यात त्रुटी, आक्षेप याची चौकशी, चर्चा होऊ शकते, हे मान्य करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या खरेदीत जिल्हा परिषदेचे नाव आल्यावर या तथाकथित गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचा आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

दोषींवर कारवाई  -जिल्हाधिकारी

करोना साहित्य खरेदी प्रकियेत तसेच पुरवठादार निश्चितीकरण, देयके अदा करण्यात जिल्हाधिकारी यांचा सहभाग नाही, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अंग काढून घेतले आहे. समितीचे सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व कंत्राटी आरोग्य अधिकारी नितीन लोहार यांच्या स्वाक्षरीने देयके अदा केली आहेत. विविध विभागांच्या खर्चाचे लेखापरीक्षण व प्रशासकीय तपासणी करून दोषी कारवाईस पात्र राहतील, असे देसाई यांनी सांगितले.