कोल्हापूर : करोना विषाणूमुळे  परिस्थितीत गांभीर्य जाणवत असले तरी त्या पाश्र्वभूमीवर काही विनोद समाज माध्यमात पाहायला मिळत आहेत. पूर्वी शिंकले की . सत्य आहे असे म्हंटले जात असे. परंतु आता कोणी शिंकले की . ‘चल इथून निघून जा’ असे सुनावले जाते!  .असा गमतीशीर विनोद समाज माध्यमात पाहायला मिळतो. पण अशाप्रकारे कोणी एखादा रस्त्यावर शिंकला तर त्याला चोप  मिळेल अशी काहीशी आश्चर्य वाटायला लावणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. शिंकणाऱ्या व्यक्तीस दाम्पत्याने बदडण्याचा प्रकार येथे घडला.

त्याचे घडले असे,की कोल्हापुरातील गुजरी भागातून एक दुचाकीस्वार जात होता.  त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकीवरून पती—पत्नी व लहान मुलगा जात होते.  दुचाकीवरील तरुणाने शिंकताना तोंडासमोर रुमाल वा आडवा हात लावला नाही. करोनाची धास्ती असल्याने बाजूने जाणाऱ्या जोडप्याने त्याला शिंकताना तोंडावर हात रुमाल लावण्यास सांगितले. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

शिवाय, त्यातच आणखी एक शिंक त्याला आली. यामुळे या उभयतांचा राग अनावर झाला.  त्यांनी गाडी थांबवून थेट त्या दुचाकीस्वार तरुणाला बेदम चोप दिला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. भररस्त्यात मारहाण सुरू असल्याने आजूबाजूचे विक्रेते व लोकांनी मध्यस्थ करून हा वाद मिटवला. करोनाच्या पाश्र्वभूमीवर लोक आरोग्याप्रति किती जागरूक झाले आहेत याचा आणि त्यातून मारहाणीला तोंड कसे फुटू  शकते याचा हा मासलेवाईक नमुना कोल्हापुरात पाहायला मिळाला.