करोनाचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर कराड येथून आलेल्या विद्यार्थ्याला स्वत:चे घर राहण्यास देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची बुधवारी सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांनी रुकडी (ता. हातकणगले) येथील घराचे दरवाजे उघडून प्रत्यक्ष कृतीतून असा उपक्रम सुरु केला आहे.

करोना रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत असल्याने खासदार माने यांनी गावच्या सहकार्यातून नव्या उपक्रमाचे सुतोवाच केले होते. नकारात्मक अहवालानंतर घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे ही त्यांची संकल्पना होती.

या संकल्पनेला ‘आपुलकी गृहा’चे नाव देत रुकडी येथील स्वत:चे घर देवून उक्ती–कृतीचा मेळ त्यांनी घालवून दिला. कराड येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी रुकडीमध्ये आला. चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली.

“संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी सुविधांवर मर्यादा येत असतात. त्याचबरोबर काही प्रमाणात भेदभाव दिसून येतो. अशावेळी माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करुन दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे,” अशी भावना या विद्यार्थ्याने यावेळी व्यक्त केली.