दयानंद लिपारे

सगळय़ा जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाचा फटका यंदा गुलाबालाही बसला आहे. भारतासह मुख्यत्वे युरोपीय देशात करोनामुळे झालेल्या अस्थिर वातावरणाने यंदाच्या ‘प्रेम दिवशी’ (व्हॅलेण्टाइन डे) गुलाबाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. दरवर्षीची ‘व्हॅलेंटाईन’वेळची निर्यातही यंदा निम्म्यावर आली आहे. करोनामुळे आधीच कोमेजलेली ही गुलाब शेती वर्षांतील हा सर्वात मोठा हंगामही वाया गेल्याने आणखीच सुकून गेली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने जगभरात गुलाबाचाही उत्सव  साजरा होतो. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी संकेताने दिल्या-घेतल्या जाणाऱ्या गुलाबाला मोठी मागणी असते. ही बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने फूल उत्पादक शेतकरी डिसेंबर उजाडताच कामाला लागलेला असतो. गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यापासून ते प्रत्यक्ष फूल तोडून बाजारात पाठवेपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये सततच्या बदलत्या हवामानाला तोंड देत घेतलेल्या फुलांच्या उत्पादनापासून ते योग्यरीत्या काढणी-बांधणी करत वातानुकू लित व्यवस्थेद्वारे बाजारात पाठवेपर्यंत या सर्व टप्प्यांवर शेतक ऱ्यांना मोठी काळजी आणि कष्ट घ्यावे लागतात. या कामी श्रम आणि वेळेसोबतच त्यांचे पैसेही मोठय़ा प्रमाणात गुंतलेले असतात. या साऱ्यामागे मुख्यत्वे फेब्रुवारीत येणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’वर त्यांची भिस्त  असते. राज्यात पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात गुलाबाची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. या दोन जिल्ह्य़ातूनच दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन’ वेळी तब्बल दीड कोटी गुलाबाची युरोपात निर्यात होते. यंदा मात्र ही निर्यात जेमतेम पन्नास लाखांपर्यंत झाली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या अशाश्वत स्थितीमुळे व्यापाऱ्यांनी गुलाबाच्या मागणीत हात आखडता घेतला आहे.

झाले काय?

प्रेम दिवसाच्या निमित्ताने अगदी स्थानिक शहरापासून ते दूर युरोपातील अनेक देशांपर्यंत गुलाबाची फुले रवाना होतात आणि यातून कोटय़वधींची उलाढाल होते. यंदा मात्र या सर्व गणिताला करोनामुळे हरताळ फासला गेला आहे. सार्वजनिक जीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी अद्याप एकत्र येण्यावर तसेच उत्सवांवर बंधने आहेत. ‘व्हॅलेंटाईन’च्या गुलाबासाठी आजवर खरेतर मुख्य बाजारपेठ ही युरोपातील अनेक देश राहिलेले आहेत. मात्र गेले वर्षभर करोनाग्रस्त असलेल्या युरोपातील अनेक देशात करोनाची दुसरी लाट आलेली आहे. यामुळे हक्काची बाजारपेठ असलेल्या युरोपातून गुलाबाची मागणी निम्म्यावर आली आहे.

हवामानाचाही अडथळा

करोनाबरोबरच यंदा सततच्या बदलत्या हवामानाने देखील गुलाब उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मागील वर्षी जून महिन्यातील वादळाने अनेक उत्पादकांची हरितगृहे (पॉलिहाऊ स) उजाड  झाली. एक एकर हरितगृहासाठी असे नवे छत बसवण्यासाठी सात लाख रुपयांचा खर्च आला. यंदा सतत पडलेल्या पावसानेही गुलाबाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. संततधार पाऊस आणि अपुऱ्या थंडीने यंदा फुले कमी आली आहेत.

गेल्या वर्षी सव्वा कोटी गुलाबांची निर्यात केली होती. यंदा हे प्रमाण निम्म्याहून अधिक घटलेले आहे.  दुसरीकडे गेल्यावर्षी गुलाबाला सरासरी १२ रुपये दर मिळाला होता तो यंदा ४ रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे गुलाब उत्पादकांना यंदा दुहेरी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

– शिवाजीराव भेगडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ

कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ातील गुलाब शेती करणारे अनेक शेतकरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात श्रीवर्धन बायोटेक, घोडावत उद्योग समूह येथे शंभराहून अधिक एकरामध्ये फुलशेती केली जाते. यंदा हे सर्वच उत्पादक करोनामुळे अडचणीत आले आहेत. आम्ही दरवर्षी सात लाख गुलाबांची निर्यात करायचो. यंदा ती कशीबशी एक लाख झाली आहे.

– गणपतराव पाटील, श्रीवर्धन बायोटेक