News Flash

‘करोना’मुळे मटणाची टंचाई!

कोल्हापूर हे झणझणीत मटणाच्या तांबडय़ा—पांढऱ्यात रश्श्यासाठी प्रसिद्ध आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मोठी जनावरांची बाजारपेठ असलेल्या पेठ वडगाव येथे जनावरांचा बाजार बंद राहिल्याने शुकशुकाट होता.

|| दयानंद लिपारे

चिकनकडे पाठ फिरवलेल्या खवय्यांचा कल मटणाकडे

कोल्हापूर : करोना विषाणूच्या भयगंडामुळे खवय्यांनी ‘चिकन’कडे कानाडोळा केला आहे. मांसाहारी खवय्यांनी मटणाकडे अधिक लक्ष पुरवले असल्याने मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे मटणाचे दरही वाढले आहेत. शासनाने बाजार भरवू नये, असे धोरण जाहीर केल्यामुळे बकरी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे आगामी काही दिवसात मटणाची उपलब्धता होण्याची शंका भेडसावत आहे. याचा अन्य घटकांवरही परिणाम होताना दिसत आहे.

कोल्हापूर हे झणझणीत मटणाच्या तांबडय़ा—पांढऱ्यात रश्श्यासाठी प्रसिद्ध आहे. याच्या जोडीने मासे, कोंबडीचे मटण (चिकन) कडेही खवय्यांचा कल असतो. मात्र करोना विषाणूचा फैलाव होण्यास चिकन कारणीभूत असल्याचा गैरसमज पसरला आहे. त्याचा प्रचंड फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसला आहे. शंभर ते सव्वाशे रुपये किलो दराने विकले जाणारे चिकन हे १०० रुपयाला ५ किलो अशा दराने विकले जात आहे. तर, सीमाभागात काही ठिकाणी कोंबडय़ा फुकट वाटल्या आहेत. चिकनविषयीची भीती दूर होण्यासाठी गेल्या आठवडय़ात कोल्हापुरात स्वस्त दरात ‘चिकन महोत्सव’ आयोजित केला असता तेथे खवय्यांची तुंबळ गर्दी उसळल्याने महोत्सव आवरता घ्यावा लागला होता. तरीही सध्या चिकनच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. कोल्हापूरकर मटणप्रेमी असल्याने त्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. विक्रीमध्ये २० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बकऱ्यांची टंचाई

मटणाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे सध्या सहाशे रुपये किलो दराने मटण विक्री होत आहे. कोल्हापुरात मटण दरावरून आंदोलन झाल्यामुळे ५२० रुपये किलो प्रमाणे मटण विकले जात आहे. मटणाची मागणी वाढल्याने बकऱ्यांची उपलब्धता होण्याची अडचण आली आहे. औरंगाबाद, चाकण, भडोच, जत, पेठ वडगाव, मुरगूड येथे बकऱ्यांची मोठी बाजारपेठ आहे. शासनाने बाजार भरण्यावर र्निबध घातले असल्याने बकऱ्यांची बाजार समितीत उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे बकरी मिळवायची कोठून? याचा पेच मटण विक्रेत्यांना पडला आहे. थेट पशुपालक, मेंढपाळ यांच्या वस्तीवर जाऊन बकरी खरेदी करणे हा पर्याय असला, तरी तो त्रासदायक आहे. घाऊक प्रमाणात बकरी मिळत नसल्याने पुढील आठवडय़ात बकऱ्याची; पर्यायाने मटणाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता मटण विक्रेते सुजित प्रभावळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलून दाखवली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:30 am

Web Title: coronavirus chicken non veg mattan problem akp 94
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्य़ात माणूस-गवा यांच्यात वाढता संघर्ष
2 कोल्हापूरला दगावलेला रूग्ण करोनाचा नाही
3 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्य किराणा माल घेण्याची सक्ती
Just Now!
X