कोल्हापूर : कोल्हापूर : करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापारी जगतातही दखल घेतली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरमध्ये तीन दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस बाजारपेठ बंद राहणार आहे. यामुळे कोटय़वधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. करोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर सावधगिरी बाळगली जात आहे. आठवडी बाजार भरवू नयेत. बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे. याची दखल घेऊन कोल्हापूरजवळ असलेल्या गांधीनगर येथे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गांधीनगरमधील सुमारे दीड हजाराहून अधिक दुकाने बंद राहिली आहे.

गांधीनगर ही कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. याशिवाय भांडी. स्टेशनरी. विद्युत व गृहपयोगी साधने यांचीही येथे प्रामुख्याने घाऊक तसेच किरकोळ प्रमाणात विक्री केली जाते.

शहरातील गावातील सर्व दुकाने बंद राहिल्याने दररोज सुमारे ७ कोटीची उलाढाल ठप्प झाली. नेहमी गजबजलेल्या गांधीनगरमध्ये आज शुकशुकाट जाणवत होता.   या बंदमध्ये पूज्य सिंधी सेंटर पंचायत, होलसेल व्यापारी असोसिएशन, रिटेल व्यापारी असोसिएशन यांचा सहभाग होता असे भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष मनोज बचवाणी यांनी सांगितले.