17 December 2017

News Flash

कोल्हापूर मनपा पोटनिवडणूक: भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी

सतेज पाटील, मुश्रीफ यांच्यापेक्षा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील भारी

कोल्हापूर | Updated: October 12, 2017 11:16 AM

कोल्हापूर महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११) पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजय झाले.

कोल्हापूर महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११) पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजय झाले. त्यांना एकूण (१,३९९) मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी- कॉंग्रेस या सत्ताधारी आघाडीचे राजू लाटकर यांचा पराभव केला. लाटकर यांना (१,१९९) मते मिळाली. स्थायी समितीचे माजी सभापती लाटकर यांना सलग दुसऱ्यांदा पराभवास सामोरे जावे लागले.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, सत्ताधारी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात अत्यल्प संख्याबळाचा फरक आहे. परिणामी स्थायी समितीसह परिवहन समिती, महिला व बालकल्याण समिती, प्राथमिक शिक्षण समितीसह चारही प्रभाग समितीत एक-दोन मतांच्या फरकाने सभापती निवड होत असते. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधकांना एकेक नगरसेवक महत्वाचा आहे. अक्षरशः थोडक्यात पारडे इकडचे तिकडे होऊन सभापती बदलाचे राजकारण घडू शकते. अशा वातावरणात ही पोटनिवडणूक लागली होती.

ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. परिणामी पोटनिवडणूक झाली. परंतु, कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात एका दिवसात प्रभागात २० हून अधिक बैठका घेऊन भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप-ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांनीही गेले आठवडाभर प्रभागात ठाण मांडले होते. हक्काचा मतदारसंघ असल्याने कोणत्याही स्थितीत उमेदवार विजयी करण्याचा चंग बांधला होता. त्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही प्रभागातील एक अन् एक घर अक्षरशः पिंजून काढले. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही जोरदार फिल्डिंग लावली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही आपापल्यापरीने मतदारांची जबाबदारी स्विकारली होती.

First Published on October 12, 2017 11:16 am

Web Title: corporation election result 2017 tararani panel bjp candidate ratnesh shirolkar win in kolhapur