कोल्हापूर : जातपडताळणी वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरसेवकपद रद्द होऊन घरी बसण्याची वेळ आली होती, पण पालकमंत्री, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कोल्हापुरातील २० नगरसेवकांना जीवदान लाभले. जीव भांडय़ात पडलेल्या या सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी मंत्री पाटील यांची भेट घेऊन ‘दादा.. तुमच्यामुळेच वाचलो’ अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन लोकहिताचा हा निर्णय आपण घेतला आहे. चांगले काम करा. कोणाच्याही पदावर गंडांतर येणार नाही, असा विश्वास पाटील यांनी या वेळी दिला.

महाराष्ट्र महानगरपालिका, नगरपंचायती व इंडस्ट्रियल टाउनशिप नियम १९६५ मधील कमल ९ (अ) नुसार निवडून आलेल्या प्रत्येकाला सहा महिन्यांच्या आत कोणतेही कारण न सांगता जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने २३ ऑगस्ट रोजी निकालपत्रात कोल्हापुरातील २० सदस्यांना अपात्र ठरविले. यानंतर राज्य शासनाने कलम ९ (अ)मध्ये बदल करीत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांवरून १२ महिने केली. हा बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने करीत राज्यभरातील नऊ  हजार सदस्यांचे पद वाचले. शासनाच्या या निर्णयामागे महसूलमंत्री पाटील यांचे मोठे योगदान आहे.

दरम्यान, पद वाचविण्यासाठी या नगरसेवकांनी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्री पाटील यांना विनंती केली होती. या पाश्र्वभूमीवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्यांनी पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावर पाटील म्हणाले, की प्रा. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच हे सर्व शक्य झाले. या नगरसेवकांमुळेच राज्यभरातील नऊ  हजार सदस्यांना दिलासा मिळाला. कोणाचेही विनाकारण पद जाणार नाही. दोन दिवसांत कलम ९ (अ) मधील बदलाची अधिसूचना जारी होईल. यानंतरही १५ दिवस प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत असणार आहे.

या वेळी प्रा. जयंत पाटील, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विलास वास्कर, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, मुरलीधर जाधव, डॉ. संदीप नेजदार, अफजल पिरजादे, सचिन पाटील, आदिल फरास, सतीश घोरपडे, दूर्वास कदम उपस्थित होते.