‘हल्लाबोल आंदोलना’त अजित पवार यांची टीका

लहानग्यांची  चिक्की, महामानवांचे छायाचित्र , गरिबांची  औषधे, आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, चहा घोटाळा, उंदीर मारण्याचे कंत्राट ; अशा मिळेल त्या कामात भ्रष्टाचार करून पसे खाण्याचे उद्योग राज्यसरकारने केले आहेत. अशा या सरकारला काही शरम उरली आहे का, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तारूढ भाजप शासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ‘हल्लाबोल आंदोलना’च्या सभेत पवार बोलत होते. मुरगुड ता. कागल येथे झालेल्या सभेत त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे , महिला आघाडी अध्यक्षा आमदार चित्रा वाघ आदींनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर कडाडून टीका केली . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या रडारवर राहिले .

केंद्र आणि राज्य सरकार मध्ये शरद पवारांसारखे शेतकऱ्यांसाठी कर्तृत्ववान नेतृत्व होते .

आता मात्र शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नाही, अशी खंत व्यक्त करून पवार म्हणाले ,बळीराजावर  अस्मानी- सुलतानी  संकट ओढवले , त्यांनी गळफास घेतला  तरी गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारवर काहीच  परिणाम होत  नाही. कर्जमाफी पाहिजे असेल तर थकबाकी भरण्याचा सल्ला दिला जातो. दुष्काळ, गारपिटीने मोडलेल्या शेतकऱ्याकडे थकबाकी भरायला पसे असते तर सरकारकडे हात कशाला पसरले असते, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला . महाराष्ट्रास पंधरा वष्रे मागे लोटणाऱ्या भाजप सरकारला खड्यासारखे फेकून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

नीरव मोदी, ललित मोदी, चोक्सी, विजय माल्या यांनी जनतेचा पसा लुटला. त्यांनी  अब्जावधी  रुपयांची लूट करून बँका लुटल्या. पण  फडणवीस सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी एक हजार  रुपये देण्याची  दानतही   नाही , असा घणाघाती टोला  पवार यांनी लगावला.

स्वागत प्रवीणसिंह पाटील यांनी केले. प्रास्ताविक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आभार शिवानंद माळी यांनी मानले.

एप्रिल फूल आणि मोदी

समाज माध्यमावर काल एक एप्रिल रोजी नरेंद्र  मोदींचा वाढदिवस झाला. पंतप्रधान झाल्यापासून मोदी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेला दररोज एप्रिल फूल करत आहेत , अशा शब्दात धनंजय मुंढे यांनी खिल्ली उडवली. मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी विदेशात जाऊन सगळा काळा पसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करेन असे सांगितले होते, पण आजतागायत पंधरा पसेही आले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. महागाई हटवण्याची घोषणाबाजी करणाऱ्यांच्या राज्यात ५० रुपये  प्रति लिटर असणारे  पेट्रोल ८२  रुपये, २००  रुपयांचा गॅस ८००  रुपये, तर ७०  रुपयांची डाळ ३००  रुपयांवर गेली आहे . हेच अच्छे दिन जनतेला दाखवायचे होते का , अशी विचारणा त्यांनी केली .