केवळ लिहिण्या, वाचण्याचा काळ आता संपला असून, विज्ञान, तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासूवृत्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. कर्मवीरअण्णांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून समाजातील शेवटच्या घटकातील मुलांनाही शिक्षणाची दारे खुली करून राष्ट्रउभारणीला बळ देण्याचे कार्य साधल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या श्रीमती गंगुबाई पायगोंडा पाटील विद्यार्थिनी वसतिगृह व डॉ. एन. डी. पाटील सभागृह नामकरण समारंभात खासदार पवार बोलत होते. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह हजारो विद्यार्थी व रयत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

पवार म्हणाले, की सर्वत्र ज्ञानदीप तेजोमय करणाऱ्या कर्मवीरांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. कर्मवीरांनी दाखवलेल्या दिशेनेच ‘रयत’ची वाटचाल सुरू आहे. मुलींच्या शिक्षणात तर रयत आघाडीवर असून, मुलींना संधी मिळाल्यास त्या कोणतीही जबाबदारी पेलतात. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाच्या संधीतून देशाची प्रतिष्ठा वाढवली. गरीब, उपेक्षितांना साथ करीत देशाला योग्य दिशा देण्याचे कामही इंदिराजींकडून झाल्याचे प्रशंसोद्गार पवार यांनी काढले. आपण संरक्षणमंत्री म्हणून अमेरिका व इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलो असता मानवंदना देण्यात महिला सैन्य अधिकाऱ्यांची फौजच दिसून यायची, पुढे आपण सैन्यदलात २० टक्के महिला घेण्याचा निर्णय संरक्षणमंत्री म्हणून घेतला होता. सैन्यातील महिलांच्या या सहभागामुळे वायुसेनेच्या विमान अपघाताचे प्रमाण निम्म्याने घटल्याने आपण घेतलेला तो निर्णय सकारात्मक परिणाम करणारा होता, हे स्पष्ट झाल्याचे पवार यांनी नमूद केले. आपले मित्र निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी याच महाविद्यालयात उमेन्स मिल्ट्री अ‍ॅकॅडमी सुरू केली आहे. तर, संभाजीरावांकडून कराड येथे भरवण्यात येणाऱ्या विजय दिवसची छायाचित्रे पाहिली की संरक्षणमंत्रिपदाची आठवण झाल्याखेरीज राहात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मवीरांना साथ करणारे व त्यानंतर ‘रयत’मध्ये योगदान देणाऱ्यांचा संस्थेने कधी विसर पडू दिला नाही. आज कर्मवीरांच्या आईच्या नावाने वसतिगृह तर कर्मवीरांच्या विचाराने अनेक दशके रयत शिक्षण संस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नावाने सभागृह सुरू करून या दोन महान व्यक्तींबद्दल संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. सद्गुरू गाडगे महाराज यांनी कर्मवीरअण्णांना तसेच ‘रयत’ला भरीव सहकार्य करताना स्वच्छतेचा संदेश देत शिक्षणाची गंगाही आपल्या ओव्या व गीतांतून घराघरांत पोहोचवली. देवळातील दगडधोंडय़ांना नव्हेतर शाळेत जाऊन विद्येला नमस्कार करण्याचे विचार गाडगेबाबांनी दिले. त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयाचा परिसर उत्तमोत्तम असून, हे आधुनिक शिक्षण देणारे केंद्र बनल्याचे पवार यांनी सांगितले.

डॉ. अनिल पाटील म्हणाले, की कर्मवीरांनी गाडगे महाराजांना गुरू मानले होते. म्हणूनच गुरूच्या नावाने त्यांनी हे महाविद्यालय सुरू केले. या कामी बंडोगोपाळा मुकादम यांनीही मोठे अर्थसाहाय्य दिले. तर, पुण्याच्या मंडईतील हमालांच्या घामाच्या दामातून हे महाविद्यालय उभे राहिल्याच्या घटनेला त्यांनी उजाळा दिला. हे महाविद्यालय सध्या महाराष्ट्रातच नव्हेतर देशात अव्वलस्थानी आहे. आता या कॉलेजसह सातारच्या तीन महाविद्यालयांना क्लस्टर युनिव्हर्सिटी करीत असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांचा विशेष सत्कर करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले. तर, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई यांनी कार्यक्रमासाठी पाठवलेल्या शुभसंदेशाचे वाचन रयतचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रवींद्र पवार यांनी केले.