सुभाष देशमुख यांची माहिती

कोल्हापूर  : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कु टुंबीयांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात निकष सुधारण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ही माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात आमदार पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित के ला होता. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून ‘शेतकरी स्वावलंबी मिशन आणि सन्मान योजना’ राबविण्यात आली. मात्र तरीही गेल्या चार वर्षांत शेतीमालाला हमीभाव अभाव, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण शासनाकडून नुकसान भरपाईबाबत येणारे अनेक प्रस्ताव फेटाळले जात असल्याने अर्धी कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

मंत्री देशमुख यांनी गेल्या चार वर्षांत बारा हजार २१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आल्याची कबुली दिली. यापैकी सहा हजार ८४५ प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कु टुंबीयांच्या वारसांना एक लाखाची मदत दिली आहे. मृत व्यक्ती शेतकरी होता किंवा कसे याबाबत निकष सुधारण्यात आले असून त्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शेतजमीन धारण करीत असेल तर त्या व्यक्तीस शेतकरी म्हणून गृहीत धरण्यात येते. त्या व्यक्तीने शेतीसाठी ,शेती सुधारण्यासाठी कर्ज घेतले होते किंवा कसे याबाबत निकष सुधारण्यात येत आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास आणि या कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास त्यांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात येत असल्याचे पुनर्वसन मंत्र्यांनी स्पष्ट केले.