कोल्हापुरात भाजपची सावध भूमिका

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पवार यांना अवघ्या दोन दिवसांतच सिंचन घोटाळा प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्याची बाब सोमवारी पुढे आली आहे. राज्यशासनाच्या या निर्णयाचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांंना धक्का बसला असून सत्तेसाठी केलेल्या या तडजोडीवर आणि भाजपवर टीकेचा मारा केला जात आहे. भाजपकडून मात्र सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी मैत्रीचा हात पुढे करून राज्यात सत्ता मिळवली आहे. हे सत्तानाटय़ राज्यभरात गाजत असताना राज्यशासनाचा नवा निर्णय वादाला कारणीभूत ठरला आहे. ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ  प्रकरणांच्या चौकशीची फाईल बंद करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना कळवला आहे. त्यामुळे पवार यांची चौकशीची फाईल बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या निर्णयावर सडकून टीका केली जात आहे.

कोल्हापुरातील शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी भाजपाला धारेवर धरले. संजय पवार म्हणाले,की ट्रकभर पुरावे देऊ न अजित पवार यांना तुरुंगात घालू असे म्हणणारी भाजप आता त्याच पवारांना पावन करून घेत आहे. सत्तेसाठी पाठिंबा देण्याच्या अटी —शर्तीतून हा निर्णय झाला आहे. शेतकरम्य़ांच्या हितासाठी सत्तेवर आल्याचा भाजपचा दावा खोटा असून सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी करणाऱ्या भाजपाला राज्यातील जनता धडा शिकवेल. मुरलीधर जाधव म्हणाले, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आदी नेते सिंचन घोटाळ्याचे पुरावे म्हणून बैलगाडीभर कागदपत्रे घेऊ न विधिमंडळाच्या आवारात आले होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना तुरुंगात धाडू, अशा वल्गना करणारम्य़ा भाजपाचा दुटप्पीपणा लोकांसमोर आला आहे.

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सांगितले,की सिंचन घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयात दाखल आहे. न्यायालय हे सर्वोच्च आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी काही निर्णय घेतला तरी न्यायालयात दाखल असलेल्या कागदपत्र, पुरावे आधारे न्यायालय जो निर्णय देईल तोच अंतिम असणार आहे. मनमानी निर्णय घेणारम्य़ा राजकीय नेत्यांवर लोकांचा विश्वास नाही. न्यायालय देईल तोच अंतिम निर्णय असेल.

भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांनी शासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले,की अजित पवार यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. ते गुन्हेगार ठरत नाहीत. सिंचन घोटाळ्याबाबत फडणवीस यांनी नेमके कोणते आंदोलन, भाष्य केले याचे उत्तर तेच देऊ  शकतील.