18 November 2017

News Flash

पर्यटक अभयारण्यात आणि प्राणी नागरी वस्त्यांवर

दाजीपूर -राधानगरी अभयारण्यातील स्थिती

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: May 19, 2017 1:37 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दाजीपूर -राधानगरी अभयारण्यातील स्थिती

पर्यटक अभयारण्यात आणि प्राणी नागरी वस्तींमध्ये अशी सध्याची विचित्र अवस्था कोल्हापुरात पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्य़ातील दाजीपूर -राधानगरी अभयारण्ये ही गवे आणि अन्य वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहेत. या अभयारण्यात सध्या सुटीच्या काळात या प्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येत आहेत. मात्र पाण्याचे दुर्भिक्ष आणि शेतात मिळणारे हमखास खाद्य यातून हे प्राणी मात्र नागरी वस्त्यांकडे सरकू लागले आहेत. निसर्ग आणि मानवामधील संघर्षांत हे असे विचित्र चित्र निर्माण झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या या जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक तालुक्यात जंगले आहेत . शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड,आज़्‍ारा, चंदगड आदी तालुक्यात वन विभागाचे प्रमाण अधिक आहे. करवीर, कागलच्या पश्चिम भागातही जंगली प्राण्यांचे दर्शन हमखास होते. दाजीपूरचे अभयारण्य कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या सीमेवर, राधानगरी तालुक्यामध्ये वसले आहे. हे एक आकर्षति सहलीचे ठिकाण आहे. प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे सौंदर्य येथे सामावले आहे. गवा, रेड्यांसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. सांबर, अस्वल, विविध सरपटणारे प्राणी, पक्षी, अनेक दुर्मिळ वनस्पती इथे आढळतात. इथला हा निसर्ग आणि त्यातील या वैविध्यामुळेच अभ्यसकांपासून ते पर्यटकांपर्यंत अनेकांची वर्दळ इथे सतत सुरू असते.

सध्याच्या सुटीतही पर्यटक-अभ्यासक इथे मोठय़ा संख्येने आले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत या भागात प्राण्यांचे दर्शन घडत नसल्याची तक्रार हे पर्यटक व्यक्त करत आहेत.  दरम्यान, जंगलात दर्शन न देणारे हे प्राणी गावा-शिवारात, शेतावर मात्र अचानक दर्शन देऊ लागले आहेत. पाणी आणि खाद्याच्या शोधात हे प्राणी नागरी वस्तीत येऊ लागले आहेत. यातून अनेकदा संघर्षांचे प्रसंग निर्माण होत आहेत.

नुकताच आजरा भागात गव्यांच्या हल्ल्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला. राधानगरी तालुक्यातही गव्यांच्या हल्ल्याच्या तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या घटना सतत घडत आहेत. दुसरीकडे गव्यांप्रमाणेच चंदगड, आजरा तालुक्यात हत्तींच्या उपद्रवामुळे तिथले शेतकरी त्रस्त झाले आहेत. या हत्तींकडून उसाचे पीक मोठय़ा प्रमाणावर फस्त केले जात आहे. शेतात काम करताना अनेकदा गवे, हत्ती आणि बिबटय़ांबरोबर संघर्षांच्या घटना इथे घडत आहेत.

का होते गव्यांचे आक्रमण?

गेल्या काही वर्षांत जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याने गवताळ क्षेत्र कमी  झाले. त्यामुळे खाद्याच्या शोधात हे गवे ऊस तसेच अन्य पिकांकडे वळले आहेत. जंगली गवतापेक्षा ऊस, भात पीक खाणे त्यांना पसंत पडू लागले आहे. यातूनच गेल्या काही दिवसात शेता-शिवारात हल्ल्याच्या काही घटना घडल्या असल्याचे मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, की गवा हा मुळात भित्रा प्राणी. त्याला हुसकावले की तो सरावैरा धावतो. अशातच त्याला हाकारे घातले गेले वा आरडाओरडा सुरु झाला की तो बिथरतो. त्यातून मानवावर त्याचे हल्ले वाढू लागले आहेत. एकटय़ा दाजीपूर जंगलात गव्यांची संख्या ३७० पेक्षा जास्त आहे. अन्य भागात ती आणखी जास्त आहे.

मानवी जनजीवन बदलले

गव्यांचा मुक्काम मानवी वस्तीवर वाढत चालल्याने जंगलाभोवतीच्या वस्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कष्टाने पिकवलेला ऊस ,भात पीक गव्याकडून रातोरात फस्त केले जाते. पीक जगवण्याच्या काळजीतून शेतकऱ्यांनी त्यांचा दिनक्रम बदलला आहे. बहुतेक घरांतील एखादी व्यक्ती पीक राखण्यासाठी रात्रभर शेतात मुक्काम ठोकून असते.

 

 

First Published on May 19, 2017 1:37 am

Web Title: dajipur wildlife sanctuary marathi articles