करवीरनगरीसह जिल्ह्यामध्ये गुरुवारी श्रीदत्त जयंती व पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. तर पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुका, सरबत वाटप याचे आयोजन करण्यात आले होते.
दत्त जयंती व पैगंबर जयंती एकाच दिवशी होती. शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीच्या सोहळय़ाला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यांतील लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केले होते. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा गजर पहाटेपासूनच सुरू होता. पहाटे षोडशोपचार पूजा, काकड आरती करण्यात आली. ८ ते १२ वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक, १२.३० वाजता मुख्य पादुकांची महापूजा, ३ वाजता पवमान पंचसुक्त पठण, ४ वाजता श्री उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरातून मुख्य मंदिरात आणण्यात आली. यानंतर हभप नारायणबुवा जोशी, सांगली यांचे कीर्तन झाले. ५ वाजता झालेल्या जन्मकाळ सोहळय़ावेळी अबीर-गुलालाची उधळण करण्यात आली. सुंठवडा वाटप, आरती, पाळणा आदी कार्यक्रम झाले. भालचंद्र जोशी यांच्या निवासस्थानी पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला. रात्री उशिरा निघालेल्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.
दत्त मंदिर आज फुलांच्या माळांनी सजवलेले होते. ही सजावट एका अज्ञात भाविकाने केली होती. मंदिरावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत घट्टपुजारी व सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते.
ईद-ए-मिलाद
दरम्यान, पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांनी दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मिरवणुका, सरबत, महाप्रसाद वाटप असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. मिरवणुकांमध्ये हिरवे ध्वज घेतलेले युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दुचाकींच्या हॉर्नचा कर्कश आवाज करीत निघालेल्या मिरवणुकीने लक्ष वेधले होते.