चुलतीच्या निधनाचे वृत्त समजल्याने त्या कोकणातून कोल्हापूरला येण्यासाठी निघाल्या. संचारबंदीमुळे पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखून धरले.  अखेर नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलिंग करून चुलतीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घडविले. पार्थिवास नमस्कार करून त्यांनी अर्ध्या रस्त्यातूनच परतीचा मार्ग धरला.

कोल्हापुरातील एका वृद्धेचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पुतणी कोकणातील बांदा येथे राहतात. त्यांना चुलतीच्या निधनाचे वृत्त समजले. त्या  कोल्हापूरला येणार म्हणून अंत्यविधी थांबवण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून त्या कोल्हापूरला येण्यासाठी निघाल्या.

आजरा येथे पोहोचल्यावर त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या. तेथे पोलिसांनी संचारबंदीमुळे त्यांना पुढचा प्रवास करण्यापासून रोखले. त्यांनी विनंती केली; मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पोलिसांना हे कारण पटले नसल्याने त्यांनी माहेरी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून अडचण कळवली. नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलिंग करून पोलिसांना पार्थिव दाखवण्याचा प्रयत्न केला; पण त्यासही पोलिसांकडे नकार मिळाला. अंत्यदर्शन घेऊन लगेचच परतते, अशी विनवणी केली त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. तुमचे वाहन जप्त केले जाईल पंधरा दिवस ते  मिळणार नाही, अशा शब्दांत पोलिसांनी सुनावले.

सर्वच उपाय थकल्यानंतर अखेर त्यांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारा चुलतीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. हात जोडून त्या साश्रूनयनाने पुन्हा कोकणचा घाट उतरू लागल्या.