News Flash

दुग्ध व्यवसायही ‘करोना’ग्रस्त

विक्री घटल्याने भुकटी, लोणी निर्मितीकडे कल

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

वाढत्या करोना संसर्गामुळे राज्यात टाळेबंदी लागू करावी लागल्याने दूध विक्री लक्षणीय प्रमाणात घटली आहे. परिणामी राज्यातील दूध संघांना दूध भुकटी (पावडर) व लोणी तयार निर्मिती करणे भाग पडले आहे. या दोन्हीचे दर सध्या बरे असल्याने त्याचा आर्थिक बोजा नाही. त्याची मागणी यथातथा असल्याने दूध संघानी साठा करण्यावर भर दिला आहे. दसरा दिवाळीत तो विक्रीसाठी येण्याची चिन्हे आहेत.

राज्यात करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद झाले आहेत. याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला आहे. उन्हाळ्यामुळे दुधाचे उत्पादन सध्या नेहमीपेक्षा कमी आहे. तरीही करोना टाळेबंदीमुळे हॉटेल, आइसक्रीम, महाविद्यालये – वसतिगृहे, चहा टपरी बंद असल्याने दूध विक्री घटली आहे. २० ते २५ टक्के इतकी त्यात घट झाली असल्याचे दुग्ध व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्वांत मोठ्या गोकुळ दूध संघाचे नेहमीचे संकलन १४ लाख लिटर असते. करोना निर्बंधांमुळे ते १२ लाख लिटरपर्यंत कमी झाले आहे. पुणे (६० हजार लिटर), मुंबई (५० हजार लिटर) आणि कोल्हापूर परिसर (४० हजार लिटर) या मुख्य केंद्रात दूध विक्री घटली आहे आहे. पश्चिाम महाराष्ट्रातील  चितळे डेअरीची विक्रीही सुमारे ३० टक्के कमी झाली आहे. अन्य सहकारी व खासगी दूध संघावर ही अशीच परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी शिल्लक दुधाचे काय करायचे, असा प्रश्न आहे.

भुकटी, लोणीनिर्मितीला प्राधान्य

शिल्लक दुधाचा प्रश्न असल्याने दूध संघांनी भुकटी व लोणी बनवण्यास प्राधान्य दिले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात देशात १५ हजार टन भुकटी व ८ हजार टन लोणी शिल्लक असताना केंद्र शासनाने १० हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध व्यावसायीक हवालदिल झाले होते. हा अनुभव पाठीशी असला तरी यावेळी दूध संघांनी शिल्लक दुधाची भुकटी व लोणी बनवण्याचा पर्याय निवडला आहे. सध्या बाजारात दोन्हीला मिळणारे दर हेही त्याचे एक मुख्य कारण आहे. भुकटीचे दर २७० रुपये किलो होते. ते मध्यंतरी २५० रुपये झाले होते. आता त्यामध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. लोणी दर ३०० ते ३१० रुपये किलो असे स्थिर आहेत. या दरात भुकटी, लोणी विक्री करणे परवडते, असे दूध व्यावसायिक सांगतात. एक लाख लिटर दुधापासून सुमारे दहा टन भुकटी तयार होते.

साठा करण्यावर भर

सध्या दुधाची मागणी घटली असली तरी दोन-तीन महिन्यांनंतर करोना परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा दुग्ध व्यावसायिक बाळगून आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत भुकटी-लोणी याचा साठा विक्रीसाठी बाहेर काढण्याचे नियोजन आहे. याबाबत गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले की, ‘गोकुळकडे सध्या १५०० टन व १९०० टन लोणीसाठा शिल्लक आहे. दररोज चार लाख लिटर दुधापासून भुकटी व लोणी बनवण्याची क्षमता आहे.

सध्या एक ते दीड लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने १० ते १५ टन भुकटी तयार होते. गोकुळ दिवाळीमध्ये दूध फरकापोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे १०० कोटी रुपये वाटत असतो. तेव्हा पैशाची गरज असल्याने सप्टेंबरच्या दरम्यान साठा विकावा लागणार आहे. राष्ट्रीय सहकारी दूध महासंघ (आणंद) यांच्या वतीने दर आठवड्याला भुकटी, लोणी याचा लिलाव केला जातो.

तेथे परवडणारा दर असल्याने विक्रीचे माध्यम आहे. खासगी वितरकांनाही भुकटी, लोणी विकण्याची सोय आहे. मात्र करोनामुळे दूध व्यवसायासमोर तूर्तास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचे निवारण झाल्यानंतर दूध व्यवसायासमोरील अडचणी दूर होतील.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:06 am

Web Title: declining milk sales led to powder and butter production abn 97
Next Stories
1 दूध उत्पादकांना नफ्यातील ९० टक्के परतावा देऊ
2 शेट्टी यांचा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा; ‘गोकुळ’मध्ये विरोधकांना धक्का
3 राज्यातील बांधकाम मजुरांच्या खात्यात १३७ कोटीचा निधी जमा
Just Now!
X